Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Nashik › नागरिकांच्या ‘बॅड फिडबॅक’मुळे नाशिकची पीछेहाट

नागरिकांच्या ‘बॅड फिडबॅक’मुळे नाशिकची पीछेहाट

Published On: Jun 27 2018 12:18AM | Last Updated: Jun 27 2018 12:02AMनाशिक : प्रतिनिधी 

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणांंतर्गत नाशिकने मागील वर्षाच्या तुलनेत 151 व्या स्थानावरून 63 व्या क्रमांकावर झेप घेतली असली तरी नाशिककरांनी या सर्व्हेेत महापालिकेकडून दिल्या जाणार्‍या सोयी सुविधांबाबत बॅड फिडबॅक दिल्याने पहिल्या 50 शहरांच्या पंक्तीत जाण्याची नाशिकची संधी हुकली. जर नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला असता तर स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकने आणखी मोठी झेप घेतली असती, असे सर्वेक्षण यादीतील गुणांवरून समोर आले आहे.

केंद्र सरकारने मागील तीन वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील काही निवडक शहरांची निवड करून स्वच्छ सर्वेक्षण ही मोहीम हाती घेतली. त्यात प्रामुख्याने एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश होता. सर्व्हेमध्ये महापालिकेकडून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार्‍या सोयीसुविधा, केंद्रीय पथकाने केलेली शहराची प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांचा फिडबॅक  या तीन प्रमुख मुद्यांवर शहरांना गुण देण्यात आले.

यंदा देशातील चार हजार शहरे व त्यात केंद्र सरकारच्या अमृत योजनेत निवड झालेल्या 485 शहरांचा स्पर्धेमध्ये समावेश होता. एकूण चार हजार गुणांचा हा सर्व्हे होता. त्यात नाशिकला दोन हजार 786 इतके गुण मिळाले. मागील वर्षी स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक 151 व्या स्थानावर फेकले गेले होते. बंद पडलेला खत प्रकल्प व कचर्‍याची विल्हेवाट या प्रश्‍नांमुळे नाशिकची सर्व्हेत पीछेहाट झाली होती. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने या सर्वेक्षणात मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘दत्तक’ शहर पहिल्या 30 मध्ये नेण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर घंटागाडी, कचरा संकलन, कचर्‍यापासून वीजनिर्मिती, प्रसाधनगृहांची स्वच्छता या सोयीसुविधांमुळे यंदा नाशिकने स्वच्छ शहराच्या यादीत प्रगती करत 63 व्या स्थानावर झेप घेतली. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार नाशिककरांनी या सर्व्हेमध्ये महापालिकेकडून दिल्या जाणार्‍या सोयीसुविधांबाबत प्रचंड नाराजी दर्शवत चांगला प्रतिसाद दिला नाही. नागरिकांचा उत्तम  फिडबॅक न मिळाल्याने सर्व्हेत नाशिकला फटका बसला आणि कमी गुण मिळाले. जर नाशिककरांनी चांगला फिडबॅक दिला असता कदाचित चित्र वेगळे दिसले असते.