Sat, Jan 19, 2019 07:58होमपेज › Nashik › ‘समृद्धी’साठी 57 टक्केजमिनीचे अधिग्रहण

‘समृद्धी’साठी 57 टक्केजमिनीचे अधिग्रहण

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 12:57AMनाशिक : प्रतिनिधी

जानेवारीअखेर समृद्धी प्रकल्पासाठी जिल्ह्यातील 57 टक्के जमिनीचे अधिग्रहण करण्यास प्रशासनाला यश आले आहे. एकूण संपादनापैकी 97 हेक्टर वन आणि सरकारी जमिनीचा समावेश आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्पातील अडथळे गेल्या काही महिन्यांत दूर सारले गेले आहेत. त्यामुळेच सिन्नर व इगतपुरी तालुक्यात जमीन अधिग्रहणास वेग आला आहे. दोन्ही तालुक्यांतील 44 गावांमधील एकूण दोन हजार 845 शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली आहे. एक हजार 54 खरेदीखत प्रशासनाने केले आहेत. आजमितीस एकूण 1103.39 हेक्टर खासगी क्षेत्रापैकी 578.48 हेक्टर जमीन अधिग्रहणाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण झाले आहे.  

सिन्नरमधील 397.74 तर इगतपुरीतील 180.73 हेक्टरचा समावेश आहे. जमीन अधिग्रहणापोटी 672 कोटी 52 लाख 16 हजार 236 रुपये प्रशासनाने शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे.  नगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये सद्यस्थितीत 529 शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली आहे. एकूण क्षेत्रापैकी 312.34 हेक्टर म्हणजेच 53.55 टक्के क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्यापोटी शेतकर्‍यांना नुकसानभरपाई म्हणून 177 कोटी 50 लाख 63 हजार 835 रुपये देण्यात आले. दरम्यान, या महिनाअखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यातील 75 टक्के जमीन अधिग्रहणासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील प्रकल्पाच्या कामाच्या निविदेचा मार्ग मोकळा होणार आहे.