Sun, Mar 24, 2019 16:12होमपेज › Nashik › कबड्डी प्रीमियर लीगचा 11 पासून थरार

कबड्डी प्रीमियर लीगचा 11 पासून थरार

Published On: Dec 05 2017 1:46AM | Last Updated: Dec 04 2017 11:06PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

महापालिका व क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारपासून (दि.11) शहरात नाशिक कबड्डी प्रीमियर लीगचा (सीझन 2) थरार रंगणार आहे. आठवडाभर चालणार्‍या या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडू सहभागी होणार असून, सहा संघ आमने सामने भिडणार आहेत. सोमवार 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सायंकाळी 6 ते 10 या वेळेत ही स्पर्धा रंगणार आहे. गेल्या वर्षी विभागीय स्तरावर घेण्यात आलेली ही स्पर्धा यंदा राज्यस्तरीय असणार आहे.

स्पर्धेत नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यांतील 78 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यांची सहा संघांत विभागणी करण्यात आली असून, स्पर्धेत दादाजी आव्हाड, आदिनाथ गवळी, मयूर शिवतरकर यांच्यासारख्या प्रो-कबड्डी खेळलेल्या खेळाडूंसह सिद्धार्थ देसाई, मोबिन शेख, प्रशांत जाधव, विवेक नाडार या राष्ट्रीय खेळाडूंचाही सहभाग राहणार आहे. 

स्पर्धेचे सर्व सामने मॅटवरील मैदानावर प्रकाशझोतात खेळविले जाणार आहेत. 15 साखळी सामने व चार बाद फेरीचे असे एकूण 19 सामने रंगणार आहेत. स्पर्धेतील संघांचे सराव शिबिर मंगळवारपासून (दि.5) सुरू होणार आहे. स्पर्धेच्या पारितोषिकांची रक्कम यंदा वाढविण्यात आली आहे. प्रथम विजेत्या संघाला तीन लाखांवरून पाच लाख, द्वितीय विजेत्याला  दोन वरून तीन लाख, तृतीय विजेत्याला एक वरून दोन लाख रुपयांचे पारितोषिक, तर उत्कृष्ट खेळाडूला 31 हजार, उत्कृष्ट पकडपटूला 21 हजार, तर उत्कृष्ट चढाईपटूला 21 हजार अशी एकूण 12 लाख 50 हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.