Fri, Jul 19, 2019 20:43होमपेज › Nashik › वाहनांतील व्यवसायाकडे  आरटीओचा कानाडोळा

वाहनांतील व्यवसायाकडे  आरटीओचा कानाडोळा

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 29 2017 11:36PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

रस्त्यांवर वाहने पार्क करून विविध प्रकारचे व्यवसाय करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, असे पत्र महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास (आरटीओ) सादर केले आहे. या पत्रासोबत मनपाने वाहनांची यादीही जोडली आहे. मात्र, गेल्या 11 महिन्यांतही मनपाच्या या पत्राची आरटीओ कार्यालयाने दखल घेतलेली नाही. मनपा क्षेत्रात मोठी वर्दळ असलेल्या कॉलेजरोड, गंगापूररोड, सीबीएस, शालिमार, द्वारका, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, पंचवटी कारंजा या भागात अनेक ठिकाणी विविध स्वरूपांचे व्यवसाय थाटणार्‍या वाहनांचे पीक आले आहे. ही सर्व वाहने रस्त्यालगतच उभी राहत असल्याने त्या ठिकाणी येणार्‍या ग्राहकांची संख्या मोठी असते.

त्यामुळे असे व्यवसाय करणारे वाहन आणि ग्राहकांच्या गाड्याही रस्त्यावरच लावल्या जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अशा रस्त्यालगत व्यवसाय करून रहदारीस अडथळा ठरणार्‍या वाहनचालकांना हटविण्यात येते. तथापि, गेल्या अनेक महिन्यांपासून वर्दळीच्या ठिकाणी चारचाकी व तीनचाकी गाड्या उभ्या करून त्याद्वारे फळ, भाजी विक्री, गॅरेज, वडापाव, मिसळ, शिलाई, अंडाभुर्जी, चायनीज अशा प्रकारचे व्यवसाय करणारी वाहने मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला आढळून आली आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने, मनपाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींनुसार अतिक्रमण निर्मूलन पथक  गेल्यानंतर वाहनाद्वारे व्यवसाय करणारे पळून जातात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत नसल्याचे मनपाने आटीओला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना करत पत्रासोबत संबंधित वाहनांच्या क्रमांकाची यादीही जोडण्यात आली आहे.