Wed, Mar 27, 2019 05:57होमपेज › Nashik › नाशिकमध्ये १६६ मंगल कार्यालये अनधिकृत!

नाशिकमध्ये १६६ मंगल कार्यालये अनधिकृत!

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:09PMनाशिक : प्रतिनिधी

अनधिकृत बांधकाम आणि नियमबाह्य पार्किंगचा ठपका ठेवत मनपाच्या नगररचना विभागाने शहरातील 166 मंगल कार्यालये आणि लॉन्स तसेच 237 शाळा व महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. लॉन्स आणि शिक्षण संस्थांमध्ये शहरातील अनेक बड्या हस्तींची नावे असल्याने राजकीय दबावापोटी मनपाची कारवाई नोटीसपर्यंत थांबते की ठोस कार्यवाही करणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

अनधिकृत बांधकाम आणि नियमबाह्य पार्किंगचा ठपका ठेवत मनपाच्या नगररचना विभागाने शहरातील 166 मंगल कार्यालये आणि लॉन्स तसेच 237 शाळा व महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. लॉन्स आणि शिक्षण संस्थांमध्ये शहरातील अनेक बड्या हस्तींची नावे असल्याने राजकीय दबावापोटी मनपाची कारवाई नोटीसपर्यंत थांबते की ठोस कार्यवाही करणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शहरात अनेक ठिकाणी महामार्ग आणि मनपाच्या रस्त्यांलगतच लॉन्स व मंगल कार्यालये थाटण्याचे फॅड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अगदी रस्त्याच्या कडेलाच अनेक लॉन्स असल्याने बहुतांश ठिकाणची पार्किंग रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्ते अपघात आणि वाहतूक कोंडीलाही नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने तक्रारीही वाढल्या होत्या. तसेच अनेक लॉन्स व मंगल कार्यालय चालकांनी बांधकाम करण्यासाठी मनपाच्या नगररचना विभागाची परवानगी न घेताच अनधिकृत बांधकामे उभी केली आहे. असे असूनही गेल्या अनेक दिवसांपासून त्याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत होते. परंतु, अग्‍निसुरक्षेचा प्रश्‍नाबरोबरच पार्किंगचाही मुद्दा पुढे आल्याने अखेर नगररचना विभागाला संबंधित 166 मंगल कार्यालये व लॉन्सचालकांना कारणे दाखवा नोटिसा बजवाव्या लागल्या आहेत.

यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी महापौर रंजना भानसी यांनी दिंडोरी रोडवरील काही मंगल कार्यालयांची तसेच तळमजल्यांच्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून शहरातील अशा कार्यालयांचे सर्वेक्षण करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनीदेखील शहरामध्ये व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगच्या जागी व्यवसाय करणार्‍या मालमत्ताधारकांवर कारवाई करण्याचे आदेश देत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या दोन्ही आदेशांच्या अनुषंगाने नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांनी सहाही विभागांतील कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंत्यांचे पथक स्थापन करून अनधिकृत लॉन्स व मंगल कार्यालयांची यादी तयार करून नोटिसा बजावल्या आहेत.

तसेच शहरासह परिसरात अनेक ठिकाणी खासगी शिक्षण संस्थांची इंग्रजी व मराठी माध्यमाची शाळा-महाविद्यालये आहेत. परंतु, यातील बहुतांश ठिकाणी शाळेच्या आवारात पालक, विद्यार्थी व कर्मचार्‍यांची वाहने रस्त्यावरच लागलेली असतात. यामुळे वाहतुकीला खोळंबा होत असल्याने शहरातील अशा शाळांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.