Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Nashik › शालिनी वाचली असती

शालिनी वाचली असती

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 12:42AMनाशिक : प्रतिनिधी

चांदगिरी येथील चारवर्षीय शालिनीने 10 रुपयांचे नाणे गिळल्यानंतर तब्बल 14 तासांहून अधिक वेळ मृत्यूशी झुंज देत तिने अखेरचा श्‍वास सोडला खरा; मात्र तिच्या मृत्यूस तीन रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणाच कारणीभूत ठरल्याचे समोर येत आहे. बालिकेला नाहक प्राणास मुकावे लागले असून, गरीब रुग्णांनी महागडे उपचार कसे करावे, असा प्रश्‍न यानिमित्ताने समोर आले आहे. 

नाणे गिळल्याचे लक्षात येताच तिच्या आईवडिलांनी शालिनीला सुरुवातीस बिटको रुग्णालयात आणले. मात्र, येथे तिला दाखल करून न घेता आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शालिनीला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रविवार असल्याने तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने शिकाऊ डॉक्टरांनी सलाइन लावून शालिनीवर उपचाराचा देखावा केल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी चौकशी केली.

मात्र, रात्रपाळीवरील वैद्यकीय अधिकार्‍याने उपचार होणार नसल्याचे सांगत डॉ. पवार रुग्णालयातच उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे उपचार न झाल्याने शालिनीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

नाणे गिळल्याच्या अनेक घटना

लहान मुलांकडून नाणे गिळण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. मात्र, गिळलेले नाणे  अन्ननलिकेतून सरळ पोटात जाते आणि शौचाद्वारे बाहेर पडत असल्याने मुलांना याचा त्रास होत नसतो. मात्र, शालिनीने दहा रुपयांचे नाणे गिळले होते. त्याचा आकार मोठा असल्याने शालिनीच्या अन्ननलिकेच्या वरील बाजूस नाणे अडकले होते. त्यामुळे ते पोटाच्या दिशेने सरकलेच नाही. श्‍वास घेण्यास त्रास झाल्याने अखेर 14 तासांनंतर शालिनीचा योग्य उपचाराअभावी श्‍वास गुदमरून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

नाण्याबाबत विरोधाभास 

नाशिकरोड पोलीस ठाण्यात शालिनीने एक रुपयाचे नाणे गिळल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी, शालिनी हिने 10 रुपयांचे नाणे गिळल्याचे सांगितले आणि शवविच्छेदन अहवालानंतर शालिनीच्या श्‍वसननलिकेतून दहा रुपयांचेच नाणे काढण्यात आले. 

मी ड्राय फ्रूट कंपनीत वाहनात माल लोडिंग करण्याचे काम करीत असून, आर्थिक परिस्थिती बेताची आहे. बिटको रुग्णालयातील वैद्यकीय धिकार्‍यांनी केवळ एक्सरे काढला आणि पुढील उपचाराकरिता मेडिकल कॉलेज येेथे दाखल करा, असा सल्ला दिला. त्यानुसार तेथे मुलीला दाखल केले. पुन्हा दुसर्‍यांदा एक्सरे काढला. तेव्हा ऑपरेशन करावे लागेल, असे सांगितले. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी संबंधित डॉक्टर पुणे येथे गेले आहेत. तुमच्या मुलीला काहीही होणार नाही, असे आश्‍वासन दिले. मात्र, रविवारी रात्री मुलीला त्रास होऊ लागला. तिच्या असह्य वेदना पाहून आम्ही डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत  शालिनीचा जीव गेला होता. बिटको आणि मेडिकल कॉलेज येेथे आवश्यक उपचार केले गेले नाही, त्यामुळेच माझ्या मुलीचा जीव गेला आहे. 

- दत्तात्रय हांडगे, मुलीचे वडील

शालिनीच्या घशात नाणे कुठे फसले होते, त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करता आले असते की नाही याचा निर्णय घेता आला असता. संबंधित वैद्यकीय अधिकार्‍याने कोणत्या निकषांवर शालिनीवर जिल्हा रुग्णालयात उपचार होणार नाही याचा निर्णय घेतला त्यासंदर्भात त्यांच्याकडे खुलासा मागवण्यात आला आहे. 

- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक