Mon, Mar 25, 2019 09:18होमपेज › Nashik › खेळांचा पाच टक्के निधी पुढील वर्षीच खर्ची पडणार

खेळांचा पाच टक्के निधी पुढील वर्षीच खर्ची पडणार

Published On: Dec 05 2017 1:46AM | Last Updated: Dec 04 2017 11:14PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

पाच टक्के निधी खर्चाचे नियोजन या आर्थिक वर्षात महापालिकेने केलेले नसले तरी क्रीडा धोरणांंतर्गत 20 कोटी 93 लाख रुपये खर्च करून विविध विकासकामांचे प्रस्ताव प्रशासनाकर्फे मंजूर करण्यात आले असून, आता ही रक्कम पुढील वर्षीच खर्ची पडणार आहे. 2012 च्या अगोदरपासून होणार्‍या महापौर केसरी कुस्ती स्पर्धेचाही मनपा पदाधिकार्‍यांना विसर पडला असून,  अंदाजपत्रकातही त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.  शासन निर्णयानुसार अपंग कल्याण, महिला व बालकल्याण आणि क्रीडा धोरणासाठी मनपाच्या एकूण अंदाजपत्रकाच्या प्रत्येकी पाच टक्के निधीची तरतूद करणे बंधनकारक आहे. परंतु, मनपाने या तिन्ही बाबींसाठी निधीची तरतूद करूनही खर्च करताना हात आखडताच घेतला आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने अवघ्या तीन महिन्यांत अपंगांचे सर्वेक्षण आणि 20 कोटींची विविध कामे व योजनांचा आराखडा तयार करून त्यास महासभेची मंजुरीही घेतली होती. तर दुसरीकडे महिला हक्क व बालविकास समितीने पंधरा दिवसांपूर्वीच मनपात आढावा घेऊन निधी खर्चाचे आश्‍वासन समितीला दिले आहे. या दोन्ही बाबींवर खर्च करताना झालेली टाळाटाळ पाठोपाठ क्रीडा धोरणाबाबतही झाल्याचे समोर आले आहे. सन 2017-18 साठी मनपाने क्रीडासाठी 13 कोटी 24 लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने हा निधीही अखर्चितच आहे.

आता ही बाब समोर आल्याने बांधकाम विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करत एकूण 20 कोटी 93 लाख रुपयांची कामे मंजूर केली आहेत. त्यात शहरातील विविध क्रीडांगणे विकसित करणे, ग्रीन जिम, क्रीडांगणाच्या संरक्षक भिंती उभारणे, जॉगिंग व सायकल ट्रॅक विकसित करणे यासह विविध कामांचा समावेश आहे. 2012 च्या अगोदर मनपाने महापौर केसरी तसेच कबड्डी स्पर्धा घेतल्या जायच्या. मात्र, त्यानंतर आजतागायत दोन्ही पंचवार्षिकमधील पदाधिकार्‍यांना त्याचा सपशेल विसर पडलेला आहे. यामुळे आता किमान पुढील वर्षी तरी क्रीडा निधीतून या स्पर्धा घेतल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.