Sat, May 30, 2020 10:41होमपेज › Nashik › स्त्रियांचे शोषण  हा जटिल प्रश्‍न

स्त्रियांचे शोषण  हा जटिल प्रश्‍न

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 04 2018 12:21AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

स्त्रियांची सुरक्षा हा देशातील सर्वांत मोठा प्रश्‍न असून, स्त्री शोषणाविरुद्ध एल्गार पुकारणे हे केवळ स्त्रियांचे काम नव्हे. ती पुरुषांचीही नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आशालता देवळीकर यांनी केले.  बोरगड येथील संत गाडगेबाबा अभ्यासिकेतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘स्त्रीमुक्तीची वाटचाल’ या विषयावर त्या बोलत होत्या. कार्याध्यक्ष प्रमोद अहिरे, डॉ. प्रदीप जायभावे, इंदूबाई काळसर विचारमंचावर उपस्थित होते. डॉ. देवळीकर म्हणाल्या की, स्त्रिया शिकल्या, स्वावलंबी बनल्या तरी त्या सुरक्षित नाहीत. विकृत पुरुषी मानसिकतेतून बलात्कार होतात. स्त्रियांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य व वैचारिक भूमिकेचे कायद्यात रूपांतर करण्याचे कार्य डॉ. आंबेडकर यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या हिंदू कोड बिलात स्त्रीमुक्तीचा खरा विचार दिसून येतो. जागतिकीकरणामुळे चंगळवादी वृत्ती वाढली असून, पाश्‍चात्त्यांचे अनुकरण, लिव्ह इन रिलेशन, व्यसनाधीनता म्हणजे स्त्री स्वातंत्र्य नव्हे. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी ‘समतेच्या वाटेनं’, ‘माझी माय’ ही गीते सादर केली. जयप्रकाश म्हात्रे यांनी स्वागत, तर अभ्यासिका संचालक सुशीला म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. भारती पोटिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नीलम गावित यांनी आभार मानले.