Sun, Jul 21, 2019 06:22होमपेज › Nashik › टँकर काय विकायचे आहेत का

टँकर काय विकायचे आहेत का

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 12:54AMनाशिक : प्रतिनिधी

येवला तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना आणि त्यासाठी टँकरचा पाठपुरावा करणारे शिवसेना नेते संभाजी पवार यांना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मागणी पूर्ण करणे तर दूरच उलट टँकर काय विकायचे आहेत, असा सवाल केला. विशेष म्हणजे, प्रांतासह अन्य अधिकार्‍यांच्या पाहणीत  या गावांना पाणीपुरवठा करणारा स्रोत पूर्णपणे कोरडा झाल्याचे निष्पन्न झालेले असतानाही जिल्हाधिकार्‍यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत  मार्चनंतरच टँकर सुरू करण्याचा पवित्रा घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी झालेला समाधानकारक पाऊस आणि त्याचमुळे मुबलक साठा धरणात असला तरी नांदगाव, सिन्नर, सटाणा, येवला यासारख्या वर्षानुवर्षे तहानलेल्या काही गावांमध्ये मात्र नेहमीप्रमाणे उन्हाळा सुरू होण्याआधीच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. या तालुक्यांमध्ये नेहमीच टंचाई भासत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकार्‍यांना मात्र आपल्याच हाताखाली काम करणार्‍यांवर भरोसा नाही, असेच दिसून येत आहे. येवला तालुक्यातील खैरगव्हाण अंतर्गत बाळापूर, कुसमाडी, आहेरवाडी गावांना टंचाई भासू लागल्याने टँकरची मागणी नोंदविण्यात आली. या गावात खरोखरच टंचाई आहे किंवा नाही, हे प्रांत, गटविकास अधिकारी, तहसील यांनी स्वत: प्रत्यक्ष जाऊन पाहिले. तसेच जिल्हा परिषदेच्या  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकार्‍यानेही या गावांना पाणीपुरवठा करणारा स्रोत पूर्णपणे कोरडा झाल्याचा अहवाल दिला. या अहवालाच्या आधारे कसलीही वाट न बघता तत्काळ टँकर सुरू करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झालेच नाही.

त्यावर पवार यांनी पाठपुरावा केला तेव्हा त्यातही जिल्हाधिकार्‍यांनी संशयच घेतला. आताच टँकर सुरू करून विकायचे आहेत का, असा सवाल त्यांनी पवार यांना केला. जिल्हाधिकार्‍यांच्या अनास्थेने संबंधित गावांमधील महिलांना महिनाभरापासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सटाणा तालुक्यातील तीन गावांच्या बाबतीतही जिल्हाधिकार्‍यांनी अशाच पद्धतीचे धोरण स्वीकारले आहे. संबंधित गावांनी टँकरसाठी पाठविलेल्या प्रस्तावाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या दृष्टीने येवल्याप्रमाणेच याही तालुक्यातील गावांना अद्याप पाण्याचे कोणत्याही प्रकारचे दुर्भिक्ष्य नाही. टँकरच्या होणार्‍या मागणीत काही तरी ‘अर्थ’ दडलेला आहे, असेच त्यांना दिसत असल्याने मार्चनंतरच टँकर सुरू केले जातील, असा ठाम पवित्रा घेण्यात आला आहे.