Mon, Mar 18, 2019 19:19होमपेज › Nashik › ‘जलयुक्‍त शिवार’नंतरही नाशिक विभाग तहानलेला

‘जलयुक्‍त शिवार’नंतरही नाशिक विभाग तहानलेला

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:49PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची पातळी वाढल्याचा दावा सरकार करत असले तरी प्रत्यक्षात नाशिक विभागासह मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग अजुनही तहानलेलाच आहे. नाशिक विभागात जलयुक्त शिवारची 71887 कामे होऊनही सध्या या विभागात दोन वाड्या आणि 105 गावांना 59 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे 16 हजार 269 कामे झाली असतानाही या जिल्ह्यामधील 190 गावे व 13 वाड्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. तर जालना व नांदेड या जिल्ह्यांमध्ये 74 टँकर दिवसरात्र पाणीपुरवठा करत आहेत. अशाच प्रकारचे चित्र अमरावती विभागात आहे. या विभागातील अकोला, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 60 हजार 53 जलयुक्त शिवाराची कामे झाली आहेत. तेथील 106 गावांमध्ये 95 टँकर सुरु आहेत.

औरंगाबादमध्ये 2015-16 मध्ये 8898, 2016-17 मध्ये 5877 तर 2017-18 मध्ये 1495 जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करण्यात आली आहेत. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यामध्ये याच कालावधीत 9 हजार 977 कामे झाली असताना तेथे 55 टँकर धावत आहेत. बुलडाण्यात 15 हजार 607 कामे झाली असून तेथे 18 तर यवतमाळमध्ये 34469 कामे होऊनसुध्दा या जिल्ह्यात 22 टँकर फिरत आहेत.  

जलयुक्तच्या कामांमुळे यंदा पाण्याची पातळी उंचावेल, असा दावा जलसंधारण विभागाने केला होता. पण तो फोल ठरला आहे. मागिल वर्षी याच दिवशी 290 गावे व 620 वाड्यांना 314 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला होता. यंदा जलयुक्त शिवारांमध्ये भर पडली आहे. तसेच अमरावती, कोकण, नागपुर, नाशिक,  पुणे व मराठवाड्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा गेल्या वर्षीपेक्षा यंदा जादा आहे. तरीसुध्दा ग्रामीण भागांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु असल्यामुळे या अभियानावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

इतर प्रादेशिक विभागांच्या तुलनेने मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 316 टँकर सुरु आहेत. औरंगाबादमध्ये 231  तर जालना 44, परभणी 9, हिंगोली 2 आणि नांदेडमध्ये 30 टँकर सुरु आहेत. बीड, उस्मानाबाद आणि लातूरकर यंदा सुखी आहेत. या जिल्ह्यांमध्ये सध्या तरी टँकर सुरु नाहीत.

विदर्भातील अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळमध्ये 102, नाशिक विभाग 59, तर कोकणामध्ये 30 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबईपासुन जवल असलेल्या पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यामधील 6 गावे व 19 पाड्यांना 11 टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील 1 गाव व 1 वाडीत टँकरसेवा सुरु आहे. या प्रादेशिक विभागामधील उर्वरीत जिल्ह्यात अद्याप पाण्याची टंचाई नाही. तर नागपुर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर व गडचिरोली हे जिल्हे पाण्याच्या बाबतीत निश्‍चिंत आहेत.

Tags : Nashik news, Nashik, division thirsty, Water supply, 105 villages, 59 tanker,