Tue, Apr 23, 2019 18:14होमपेज › Nashik › नाशिक विभागाचा 87.42, तर जिल्ह्याचा 88.47 टक्के निकाल

दहावीतही मुलींचीच सरशी

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 09 2018 12:01AMनाशिक : प्रतिनिधी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल 87.42 टक्के, तर नाशिक जिल्ह्याचा निकाल 88.47 टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे, बारावीप्रमाणे दहावी निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. विभागात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 90.28, तर मुलांची टक्केवारी 85.16 इतकी आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये दहावी निकालाच्या विविध तारखा जाहीर झाल्याने संभ्रमात असलेल्या विद्यार्थी-पालकांची निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडेलागले होते. दुपारी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होताच विद्यार्थी-पालकांनी मोबाइल तसेच सायबर कॅफेवर गर्दी करत निकाल पाहिला. नाशिक जिल्ह्यातून परीक्षेला 90 हजार 283 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 79 हजार 872 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुले आणि मुलींचा विचार केला असता जिल्ह्यातून 48 हजार 859 इतके मुले, तर 41 हजार 424 इतक्या मुली परीक्षेला बसलेल्या होत्या. त्यात मुलांमध्ये 42 हजार मुले उत्तीर्ण झाले. तर 37 हजार 872 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यात मुलांची टक्केवारी ही 85.96 इतकी आहे. तर मुलींची टक्केवारी 91.43 इतकी आहे. 

त्यामुळे विभागासह जिल्ह्यातही मुलींची आघाडी कायम आहे. जिल्ह्यात एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 23 हजार 636 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर 33 हजार 47 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, ऑनलाइन निकालाच्या दुसर्‍या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याबाबतचा नमुना अर्ज शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी पुढील पाच दिवसांत विद्यार्थ्यांना कार्यालयीन वेळेत अर्ज करता येणार आहे. तर विद्यार्थ्यांना गुणपत्रक शाळांमध्ये वाटप केले जाणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.
आदिवासी विद्यार्थी आघाडीवर ः जिल्ह्यात दहावी निकालात आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्याने आघाडी घेतली आहे. कळवण तालुक्याचा निकाल सर्वाधिक 91.93 टक्के इतका लागला आहे. त्या पाठोपाठ सिन्नर 91.25 टक्के तर  त्र्यंबकचा 91.47 टक्के इतका लागला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांचा अभाव असूनही निकालात असलेली आघाडी कौतुकास्पद मानली जात आहे.

चार टक्क्यांची घसरण 

दहावीला प्रात्यक्षिक परीक्षेला मिळणार्‍या गुणांमुळे निकालाचा आकडा फुगलेला दिसत असतानाच गत तीन वर्षांचा विचार केला असता यंदा जिल्ह्याच्या निकालात चार टक्क्यांनी घसरण झाली आहे. 2005 मध्ये जिल्ह्याचा निकाल 92.83 टक्के इतका होता तो कमी होऊन यंदा 88.47  टक्क्यांवर आला आहे.