Wed, Mar 27, 2019 04:04होमपेज › Nashik › ‘जलयुक्‍त’मध्ये नाशिक विभाग राज्यात अव्वल 

‘जलयुक्‍त’मध्ये नाशिक विभाग राज्यात अव्वल 

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 12:17AMनाशिक : प्रतिनिधी

जलयुक्‍त शिवार योजनेमुळेे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधील 900 गावांमध्ये जलक्रांती झाली आहे. विभागातील पाचही जिल्हे मिळून 97 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नाशिक विभाग राज्यात अव्वलस्थानी आहे. त्याखालोखाल नागपूर विभागाने 96 टक्के तर कोकण विभागाने 96.55 टक्के कामे पूर्ण करत अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले आहे. 

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्‍त शिवाराच्या कामांमुळे हजारो गावे दुष्काळाच्या छायेत बाहेर पडली आहेत. 2016-17 मध्ये नाशिक विभागातील पाचही जिल्हे मिळून एकूण 900 गावांची निवड जलयुक्‍त शिवार उपक्रमात करण्यात आली होती. या गावांमध्ये विविध प्रकारची कामे करण्यासाठी सरकारने 538 कोटी 74 लाखांचा निधी दिला. दरम्यान, या निधीमधून निवड झालेल्या गावांमध्ये विहिरी खोदणे, नाला खोलीकरण व रूंदीकरण, विहिर पुनर्भरण, गाळ काढणे, मचकीची तसेच इतर जलसंधारणाची अंदाजे 10 हजाराच्यावर कामे पूर्ण करण्यात आली. 

नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमधील 219 गावांमध्ये  5 हजार 494 कामे पूर्ण झाली आहेत. नगरमधील 268 पैकी 252 गावे ही जलयुक्तमुळे ओलिताखाली आहे. उर्वरित 16 गावांमधील कामे अंतिम टप्प्यात आहेत. धुळ्यातील 123 पैकी 115 गावांमध्ये 100 टक्के कामे झाली आहेत. जळगावमधील 222 पैकी 217 गावे तर नंदुरबारमधील 69 पैकी 67 गावांमध्ये 100 टक्के जलयुक्तची कामे पूर्णत्वास आली आहेत. 

विभागात 2016-17 च्या आराखड्यानुसार 869 गावांमधील कामे पूर्ण झाली असून, 31 गावांमधील कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांमुळे जिल्ह्यांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चांदवड, कळवण तसेच सिन्नर तालुक्यांमध्ये दोन वर्षात जलयुक्तअंतर्गत झालेल्या कामांमुळे हे भाग टंचाईमुक्त झाले आहेत. इतर जिल्ह्यांमधील तालुक्यांची भूजल पातळीत वाढ होण्यास मदत मिळाली आहे. 

4439 गावांमध्ये 100 टक्के कामे

राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 5 हजार 288 गावांमध्ये 2016-17 मध्ये जलयुक्त शिवारची कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी 4 हजार 439 गावांमधील 100 टक्के कामे पूणर्र् झाली आहेत. 643 गावांमधील कामे हे 80 टक्क्यांच्यावर तर 182 गावांमधील कामे 50 टक्के पूर्ण झाली आहेत. 30 टक्के काम पूणर्र् झालेल्या गावांची संख्या 21 असून, 3 गावांमध्ये 30 टक्क्यांपेक्षा कमी कामे झाली आहेत. या सर्व गावांमधील कामांसाठी एकूण 2554 कोटी 37 लाखांचा खर्च झाला आहे.