Sun, Jan 20, 2019 20:26होमपेज › Nashik › जिल्ह्यात बंद यशस्वी

जिल्ह्यात बंद यशस्वी

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 04 2018 12:18AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांसह अन्य सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. रास्ता रोकोसह दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. द्वारका चौकात तब्बल चार तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली. जिल्हाभरातही ठिकठिकाणी रास्ता रोको, मोर्चे, ठिय्या आंदोलनांसह रॅली काढण्यात आली. पोलिसांनी 28 समाजकंटकांना ताब्यात घेतले. बंदमुळे जिल्ह्यातील बहुतांशी बाजारपेठा बंद होत्या. शाळा- महाविद्यालयांमध्येही शुकशुकाट दिसून आला.  सोमवारी (दि.1) भीमा-कोरेगाव येथे दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्याने त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यामुळे बुधवारी (दि.3) महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला.

बंदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. प्रतिबंधात्मक कारवाईसह ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच संवेदनशील भागात जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच जिल्हाभरात विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले.  काही मोर्चेकर्‍यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यांत निवेदन देऊन या घटनेस जबाबदार असणार्‍या संशयितांविरोधात कारवाईची मागणी केली. त्यानंतर करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवल्याने कोंडी टळली. शहरातील दवाखाने व मेडिकल्स वगळता बहुतांशी बाजारपेठा बंद होत्या.  

सायंकाळी 6.30 च्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी ठक्कर बझार येथे उभ्या असलेल्या शिवनेरी बसवर दगडफेक करून नुकसान केले होते. जेलरोड, नाशिकरोड, सातपूर, सिडको या परिसरात रास्ता रोको केल्याने काही तास वाहतूक खोळंबली होती.  जेलरोड परिसरात किरकोळ दगडफेक झाल्याने एक युवक जखमी झाला. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.