Mon, Jun 17, 2019 14:52होमपेज › Nashik › जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची लाचलुचपतमार्फत चौकशी करा

जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची लाचलुचपतमार्फत चौकशी करा

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 11:39PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या नोकरभरतीत मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मीदर्शन’ झाले असल्याचा आरोप करीत जनता दलाचे सचिव डॉ. गिरीश मोहिते यांनी या भरतीची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र दिले आहे. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ डिसेंबरच्या अखेरीस बरखास्त करण्यात आले असून, ज्या आधारे सहकार आयुक्तांनी निर्णय घेतला, त्यात नोकरभरतीचाही मुद्दा समाविष्ट आहे. एकूण 416 शिपाई आणि लिपिकांची भरती करण्यात आली आहे. त्यात एका आमदाराच्या शिफारशीने भरण्यात आलेले 16 कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. 400 कर्मचारी अजूनही सेवेत आहेत.

ही भरती करताना कोणत्याही प्रकारचे निकष पाळण्यात आले नाहीच शिवाय मागासवर्गीयांचा अनुशेषही डावलण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाल्यानेच अशा पद्धतीने भरती करण्यात आल्याचा आरोप डॉ. मोहिते यांनी केला आहे.  ‘कलम 88’ नुसार झालेल्या चौकशीअंती दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात प्रत्येक संचालकावर 42 लाख रुपयांची वसुलीही निश्‍चित करण्यात आल्याचे मोहिते यांनी म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र देण्यात आले आहे. तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.