Wed, Jan 23, 2019 03:06होमपेज › Nashik › कर्मचार्‍यांअभावी सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्ण ताटकळत

कर्मचार्‍यांअभावी सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्ण ताटकळत

Published On: Dec 20 2017 1:42AM | Last Updated: Dec 20 2017 1:27AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

वर्‍हाडाचा ट्रक पलटी झाल्यानंतर त्या अपघातातील 38 जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यातील काही जखमींना सीटीस्कॅन करावे लागल्याने रुग्णालयातीलच सीटी स्कॅन कक्षात नेले. मात्र, कर्मचारी उपलब्ध न झाल्याने सुमारे तासभर रुग्णांना सीटीस्कॅनसाठी ताटकळत बसावे लागले. कर्मचारी न आल्याने रुग्णांना पुन्हा कक्षात नेण्याची नामुष्की आली. 

वर्‍हाडाचा ट्रक उलटल्यानंतर जिल्हा रुग्णालयास अपघाताची माहिती कळवण्यात आली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने हालचाल करून आपत्कालीन कक्षात जागा उपलब्ध केली. त्यानंतर रुग्ण येताच या कक्षात व्हिलचेअर, स्ट्रेचर किंवा हातात धरून रुग्णांना आणले. तेथे डॉक्टरांसह परिचारिकांनी उपचारास सुरुवात केली. मात्र, एकाच वेळी 30 हून अधिक रुग्ण आल्याने उपचारासाठी आवश्यक असणारे ‘ट्रे’सह इतर साहित्य कमी पडले. तरीदेखील संबंधितांनी वेळेचे भान राखत रुग्णांवर आवश्यक ते उपचार करून त्यांना दिलासा दिला. त्यानंतर दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सर्व रुग्णांना इतर कक्षांमध्ये हलवून त्यांचे उपचार पूर्ववत केले. 

जखमींमधील काही रुग्णांना सीटीस्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार जखमींना सीटीस्कॅनसाठी नेण्यात आले. मात्र, तेथे कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना तासभर तेथेच ताटकळत बसावे लागले. तरीदेखील संबंधित कर्मचारी न आल्याने रुग्णांना पुन्हा कक्षात पाठवण्यात आले. अपघाताची माहिती समजताच आरोग्य उपसंचालक एल. घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी जखमींची विचारपूस केली.जखमींवर उपचारासाठी चार शल्यचिकित्सक, तीन अस्थिरोगतज्ज्ञ, सहा परिचारिका, 15 प्रशिक्षणार्थी परिचारिकांचीही मदत यावेळी घेतल्याने जखमींना वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली.