Wed, Nov 21, 2018 23:32होमपेज › Nashik › जि. प. शाळांची भिस्त अवघ्या सातशे गुरुजींवर

जि. प. शाळांची भिस्त अवघ्या सातशे गुरुजींवर

Published On: Dec 05 2017 1:46AM | Last Updated: Dec 04 2017 11:10PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शिक्षणमंत्र्यांनी राज्यभरात शंभर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारण्याचा मानस व्यक्त केला असला तरी दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार्‍या गुरुजींची मोठ्या प्रमाणात कमतरता भासते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन लाख 85 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी अवघ्या सातशे शिक्षकांवर आहे. त्यामुळे जि. प. शाळातील शिक्षणाच्या दर्जावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी जि. प. शाळा डिजिटल करण्याचा उपक्रमदेखील हाती घेण्यात आला आहे. एकीकडे शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडविण्याचे प्रयत्न सुरू असताना जि. प. शाळेत शिक्षकांची मोठी कमतरता असल्याचे समोर येत आहे. नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या तीन हजार 300 शाळा आहेत. त्यामध्ये पावणेतीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांचे प्रमाण अत्यल्प आहे. लाखोंच्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्याची भिस्त अवघ्या सातशे शिक्षकांवर आहे. 

राज्यात 2010 साली अंतिम शिक्षक भरती झाली होती. मागील सात वर्षांपासून भरती न झाल्याने जि. प. शाळेत शिक्षकांची मोठी कमतरता जाणवत आहे. त्यात दरवर्षी सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांच्या बळावरच जि. प. शाळेत ज्ञानयज्ञाचे काम सुरू आहे. त्यात शिक्षकांवर निवडणूक, मतदार नोंदणी या शाळाबाह्य कामांचादेखील अतिरिक्त ताण असतो. या सर्वांचा परिणाम जि. प. शाळेतील शिक्षणाच्या दर्जावर होत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आंतरजिल्हा बदलीद्वारे दोनशे शिक्षक उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षक विभागाने घेतला आहे. शासनाने शिक्षक भरती केल्यास जि. प. शाळेतील शिक्षक कमतरतेचा मुद्दा निकाली लागेल, अशी आशा शिक्षण विभागाला आहे.