Wed, Nov 21, 2018 13:17होमपेज › Nashik › भुजबळ छोडो आंदोलन करा राज ठाकरे यांचा सल्ला

भुजबळ छोडो आंदोलन करा राज ठाकरे यांचा सल्ला

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 12:49AMनाशिक : प्रतिनिधी

भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अद्याप जामीन मिळाला नाही. भुजबळांवर सूडबुद्धीने कारवाई होत असून, त्यांच्या समर्थकांनी आता ‘भुजबळ जोडो’ नाही तर ‘भुजबळ छोडो’ आंदोलन केले पाहिजे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. भुजबळ समर्थकांनी सोमवारी (दि.5) मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत ‘अन्याय पे चर्चा’ केली. यावेळी ठाकरे यांनी भुजबळ समर्थकांचे म्हणणे ऐकून घेत याबाबत त्यांचे मत व्यक्त केले.

भुजबळांवर अन्याय होत असून, नाशिक शहर व जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली असल्याची भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्‍त केली. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भुजबळ समर्थक जोडण्याचे काम सुरू केले असून, जिल्ह्यात ‘अन्याय पे चर्चा’ ही मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते भुजबळांवर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त करत असल्याची भावना राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली. 
यावेळी ठाकरे यांनी भुजबळांवर सूडबुद्धीने कारवाई सुुरू असल्याचे मत व्यक्त केले.

आर्थिक गुन्हे प्रकरणी भुजबळ तुरुंगात असले तरी त्यांना जामीन मिळायला हवा होता. यापुढे ‘भुजबळ जोडो’ ऐवजी ‘भुजबळ छोडो’ अभियान हाती घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी आमदार जयंत जाधव, आ. नरहरी झिरवाळ,  माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जि. प. माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, समता परिषदेचे डॉ. कैलास कमोद, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे आदी उपस्थित होते. यावेळी मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते.