Sun, Jul 21, 2019 10:26होमपेज › Nashik › मालेगावच्या अत्याचारपीडित चिमुकलीस 10 लाखांचे ‘मनोधैर्य’

मालेगावच्या अत्याचारपीडित चिमुकलीस 10 लाखांचे ‘मनोधैर्य’

Published On: Apr 11 2018 12:58AM | Last Updated: Apr 11 2018 12:28AMनाशिक : प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील एका 19 महिन्यांच्या अत्याचारपीडित चिमुरडीला शासनाच्या मनोधैर्य योजनेंतर्गत नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तात्काळ दहा लाखांची मदत दिली आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी रोलमॉडेल ठरला असून, अन्य जिल्हा न्यायालयांनीही याचप्रकारे मदत द्यावी अशा सूचना देण्यात आल्याची माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत एस. शिंदे यांनी दिली.
मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील 19 महिन्याच्या चिमुरडीवर 38 वर्षीय नातलगाने अत्याचार केला होता. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलिसात पोस्को अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करून संशयितास अटक केली. या प्रकरणाचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी जिल्हा महिला व बालविकास विभागाला मनोधैर्य योजनेसंदर्भातील अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला. विभागाने विधी सेवा प्राधिकरण विभागाकडे हे प्रकरण देताच प्रधान जिल्हा व सत्र न्यायधीश सूर्यकांत शिंदे, विधी सेवा प्राधिकरणचे सचीव एस. एम. बुक्के यांनी तातडीने अंमलबजावणी केली. त्यानुसार पीडितेस अडीच लाखांचा निधी तातडीने दिला. तर उर्वरीत 7 लाख 50 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. या अंमलबजावणीमुळे राज्यामध्ये मनोधैर्य योजनेसाठी नाशिक रोल मॉडेल ठरत आहे. राज्य शासनाने याचे कौतूक करीत सर्व न्यायालयांनी याप्रकारे अंमलबजावणी करावी, असे आदेश दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली. 
 

 

 

tags : Nashik,news, devarpade,Malegaon, taluka, little, girl, Atrocity, In case ,