Wed, Sep 26, 2018 18:04होमपेज › Nashik › पंचवटीतील मृत अर्भकाच्या नातेवाइकांचा मनपात ठिय्या

पंचवटीतील मृत अर्भकाच्या नातेवाइकांचा मनपात ठिय्या

Published On: Dec 20 2017 1:42AM | Last Updated: Dec 20 2017 1:39AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

पंचवटीतील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेकडे दुर्लक्ष झाल्यानेच नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला व महापालिकेत ठिय्या मांडला. मनपाच्या दोषी डॉक्टर व नर्सवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली. 

नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी मृत बालिकेचे वडील अशोक तांदळे यांना सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रसूती होईल, असे सांगत तपासणी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या असता तपासणी करत रात्री 12 वाजेपर्यंत प्रसूती होण्याची वेळ दिली. त्यावर तांदळे यांनी प्रसूती करण्याची मागणी केली असता त्याकडे दुर्लक्ष केले. बालिकेची आजी गंगूबाई खोडे यांनीही विनंती केली असता रुग्णाऐवजी तुम्हालाच सलाईन दिले पाहिजे, असे सांगत तेथील नर्सनी रुग्णाकडे दुर्लक्ष केले.

आशा यांना त्रास वाढू लागल्याने नातेवाइकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि.19) दुपारी 12 वाजता आशा यांची प्रसूती झाली. परंतु, बाळाचा जीव गुदमरल्याने ते अत्यवस्थ झाले. यावेळी डॉक्टरांनी बाळास सुविधा असलेल्या मनपा रुग्णालयात तसेच, जिल्हा रुग्णालयात पाठविण्याऐवजी मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठविले. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. शिवाय उपचारापोटी नातेवाइकांकडून सुमारे 14 हजार रुपये घेण्यात आले.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर नातेवाइकांनी मनपा मुख्यालय गाठत वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांच्या दालनात मृत अर्भकाला घेऊन ठिय्या मांडला. मात्र, डॉ. भंडारी आले नाहीत. त्यानंतर नातेवाइकांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात येऊन अर्भकाच्या मृतदेहाला बोर्डे यांच्यासमोरील टेबलावर ठेवत टाहो फोडला. यानंतर काही वेळाने डॉ. भंडारी दाखल झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन बोर्डे यांनी दिल्यानंतर नातेवाइकांनी अर्भकाचा मृतेदह ताब्यात घेतला.