Sun, Mar 24, 2019 10:25होमपेज › Nashik › लोकशाहीर दत्ता वाघ यांचे निधन

लोकशाहीर दत्ता वाघ यांचे निधन

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 11:26PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

प्रसिद्ध लोकशाहीर तथा ज्येष्ठ शिवसैनिक दत्ता वाघ (68) यांचे रविवारी (दि.7) रात्री निधन झाले.आजारपणामुळे मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आठवणींना उजाळा देत वाघ यांना अखेरचा निरोप दिला. वाघ यांच्या पश्‍चात मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन वाघ यांनी नाशिकमध्ये सेनेचा भगवा खांद्यावर घेतला होता. यावेळी नाशिकच्या गल्लीबोळात शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी त्यांनी चोख बजावली. तसेच, राजकारणापलीकडे जाऊन एक प्रतिभावंत शाहीर म्हणून ते विख्यात होते. नाशिकचे प्रसिद्ध शाहीर प्रताप परदेशी यांच्यासोबत गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. नगरपालिकेत काम करत असताना वाघ यांनी शाहिरीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांचे घर लोककलावंतांसाठी जणू माहेरघरच होते. कलावंतांच्या पाठीशी ढाल म्हणून वावरणारा, त्यांना मायेची ऊब देणारा शाहीर ही त्यांची जनमानसात शेवटपर्यंत ओळख होती.

गानकोकिळा लता मंगेशकर, पं. हदयनाथ मंगेशकर, शाहीर अमर शेख यासारखे दिग्गज कलावंत नाशिकला आल्यावर वाघ यांच्या घरी आवर्जून भेट देत असत. शाहिर परिषदेचे ते अध्यक्ष होते. लोककलावंताचा मानधनाचा प्रश्‍न मार्गी लागावा यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. प्रकृती खालावली असतानाही ते लोककलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आधार देत असत. मागील काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते. रविवारी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. रविवार पेठेतील डांगर उतारा येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजीमंत्री बबनराव घोलप, माजी आमदार नितीन भोसले, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, माजी नगरसेवक संजय चव्हाण, सेवादल शहराध्यक्ष वसंत ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते शंकर बर्वे, शाहीर मेघराज बाफणा, गजाभाऊ बेणे, दत्ता शिंदे, लोककला मंचचे माजी अध्यक्ष माणिक बागूल, सुरेशचंद्र आहेर, रंगराज ढेगळे, विनायक पठारे, अशोक भालेराव, दाभाडे आदी यावेळी उपस्थित होते.