Sat, Mar 23, 2019 12:48होमपेज › Nashik › नाशिक न्यायालयाने आतापर्यंत 14 जणांना ठोठावली फाशी 

नाशिक न्यायालयाने आतापर्यंत 14 जणांना ठोठावली फाशी 

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:27AMनाशिक : प्रतिनिधी

दुर्मिळातील दुर्मीळ गुन्ह्यात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात येत असते. त्यानुसार नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने गत 17 वर्षांत तीन गुन्ह्यांतील 14 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी सहा आरोपींच्या फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयातदेखील कायम ठेवण्यात आलेली आहे. 

सोनई हत्याकांडातील सहा आरोपींना शनिवारी (दि. 20) जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. या निकालामुळे मागील घटनांना उजाळा मिळाला आहे. 2000 पासून 17 वर्षांत जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन घटनांमध्ये 14 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यात सुरुवातीस 19 मे 2000 रोजी मालेगाव येथील सोयगाव परिसरात मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाचे कुटुंब संपविणार्‍या दोघांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपी प्रकाश धवल खैरनार आणि एका अल्पवयीन आरोपीने मिळून ऑक्टोबर 1996 मध्ये प्रकाश यांचा सख्खा भाऊ सुपडू धवल खैरनार यांचे संपूर्ण कुटुंब गोळ्या झाडून संपवले होते. मालमत्तेची वाटणी करून घ्यावी, असा तगादा प्रकाश याने सुपडू पाटील यांच्याकडे केला होता. मात्र, नंतर पाहू असे सुपडू पाटील उत्तर देत होते. त्यामुळे संतप्त होत दोघा आरोपींनी सुपडू पाटील यांच्यासह त्यांची आई केसरबाई, पत्नी पुष्पाताई, मुली पूनम आणि बंटीताई आणि पुतण्या राकेश यांचा गोळी झाडून खून केला होता. याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रकाश खैरनारसह एका अल्पवयीन आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली होती. या निकालानंतर अल्पवयीन आरोपीने फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. 

त्याचप्रमाणे नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जून 2003 रोजी सहा आरोपींनी त्र्यंबक सातोटे यांच्या घरावर दरोडा टाकला. त्यावेळी आरोपींनी सातोटे यांच्यासह त्यांच्या घरातील पाच जणांची निर्घृण हत्या केली. त्यात एका महिलेसह एका मुलीवर आरोपींनी बलात्कार केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करून आरोपी अंकुश शिंदे, राजा शिंदे, अंबादास शिंदे, राजू शिंदे, बापू शिंदे, सूर्या शिंदे या आरोपींना 12 जून 2006 रोजी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश विना तांबी यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात देखील या सहा जणांची फाशी कायम ठेवण्यात आली आहे.