Sat, Aug 24, 2019 23:39होमपेज › Nashik › भाजपामध्ये वादांची मालिका सुरूच

भाजपामध्ये वादांची मालिका सुरूच

Published On: Dec 05 2017 1:46AM | Last Updated: Dec 04 2017 11:18PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

महापालिकेत बहुमताचा आकडा असला तरी आपापसातील मतभेदांमुळे भाजपामध्ये नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांमध्ये विरोधी मते बनू लागली आहेत. यामुळे सध्या भाजपात अंतर्गत कलह आणि धुमशान  पाहावयास मिळत आहे. दोन आजी-माजी आमदारांमधील वाद, मनपातील स्थायी समिती सभापतींनाच आव्हान देणारे नगरसेवक आणि आता आमदार सीमा हिरे यांनाच आव्हान उभे करणारे नगरसेवक अशी वादाची मालिका भाजपामध्ये सुरूच आहे. 

गेल्या निवडणुकीत एकट्या भाजपाने 122 पैकी 66 नगरसेवक आपल्या खिशात टाकले. यामुळे कुणाच्या कुबड्या न घेता भाजपाने बहुतमाच्या जोरावर मनपात सत्ता स्थापन केली. परंतु, गेल्या दहा महिन्यांपासून पक्षात निव्वळ वादावादी सुरू आहे. यामुळे विकासकामांकडे कमी या अंतर्गत वादामध्येच सध्या भाजपाचे काही नगरसेवक आणि पदाधिकारी जुंपले आहेत. यामुळे बहुमताचा आकडा असूनही सत्तारूढ पक्षाला अद्यापपर्यंत आपला जम बसविता आला नाही. विरोधकांकडून होणार्‍या आरोपांना उत्तरे देण्याऐवजी भाजपातील नगरसेवक आणि पदाधिकारी आपापसातच भांडत असल्याने विरोधकांचे आयतेच फावत आहे.

सिडकोतील पेलिकन पार्क उद्यानाची जागा पुणे अम्युझमेंटकडून मनपाच्या ताब्यात आल्याने या 17 एकर जागेवर नमो उद्यानासह रुग्णालय, बसस्थानक साकारण्याचा प्रस्ताव आमदार सीमा हिरे यांनी शासनाकडे सादर केला. त्यासंदर्भात गृह (शहरे) व नगरविकासमंत्री रणजित पाटील यांच्याकडे बैठक झाली. त्या बैठकीला आ. हिरे यांनी त्या प्रभागातील तिन्ही भाजपाच्या आमदारांना सोबत घेतले. नमो उद्यानासाठी 25 कोटींचा खर्च असला तरी सुरुवातीला किमान 10 कोटींचा निधी मिळावा, असे साकडे ना. पाटील यांना घालण्यात आले. पेलिकन पार्कच्या याच जागेविषयी विधी समितीच्या सभेत मुद्दा उपस्थित झाला असता प्रशासनाकडून आ. हिरे यांच्या प्रस्तावाविषयी चर्चा झाली. यामुळे साहजिकच पेलिकन पार्कचा हा मुद्दा इतर नगरसेवकांच्या जिव्हारी लागल्याने भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आमदार हिरे यांच्यावरच खडे फोडत भाजपामधील वाद दर्शवून दिला.

असाच प्रकार स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याबाबतही घडला. स्थायीतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांबरोबर भाजपाच्या नगरसेवकांनीही गांगुर्डे यांच्याशी पत्रप्रपंच करत पक्षाच्याच पदाधिकार्‍याला अडचणीत आणायचे काम केले होते. हे कमी की काय म्हणून देवयानी फरांदे आणि वसंत गिते या आजी-माजी आमदारांमधील वादामुळे भाजपातील वातावरण मध्यंतरी ढवळून निघाले होते. यामुळे बहुमत असूनही पदाधिकारी व नगरसेवकांमधील वादामुळे भाजपाचे शहरात हसे झाले आहे.