Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Nashik › बससेवा कुणीही चालवा; नागरिकांवर भार येणारच!

बससेवा कुणीही चालवा; नागरिकांवर भार येणारच!

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:57PMनाशिक : प्रतिनिधी

शहर बससेवेविषयी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आग्रही असल्याने सध्या मनपाकडून या सेवेचा मार्ग मोकळा करून देण्याची लगीनघाई सुरू आहे. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या क्रिसिल संस्थेच्या अहवालानुसार शहर बससेवा कुणीही ताब्यात घेतली तरी होणारा कोट्यवधींचा तोटा भरून काढण्यासाठी नागरिकांवर विविध प्रकारचा अधिकचा ‘भार’ टाकण्यावाचून गत्यंतरच नसल्याचे म्हटले आहे. यामुळे हा पांढरा हत्ती पोसण्यासाठी नागरिकांच्या खिशातून कर वसूल करण्याऐवजी शासन मदतीचा हात देणार का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

बससेवेविषयी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी क्रिसिल या सल्लागार संस्थेला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्याबाबतचे सादरीकरण महापालिकेत करण्यात आले. त्यात बससेवेसाठी लागणार्‍या खर्चाचा अंदाज देण्यात आला असून, भांडवली खर्च व बससेवा चालविण्यासाठी येणार्‍या खर्चाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच बससेवा स्वत: मनपाने चालवावी किंवा स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी स्थापन करून सेवा देण्याबाबतचे पर्याय देण्यात आले आहे. तसेच तिसरा पर्याय म्हणून पीपीपीअंतर्गत खासगी संस्थेकडे ही सेवा सोपविण्यात येऊ शकते.

त्यात तिकीटाचे दर ठरविण्याचा अधिकार मनपाला असेल. तिकीटाचे पैसे वसूल करण्यासाठी चालक मनपाचे असतील किंवा खासगी संस्थेला प्रति कि. मी. प्रमाणे पैसे देऊन ही सेवा चालविता येऊ शकते, असे म्हटले आहे. यापैकी कुठलाही पर्यायाची मनपाने निवड केली तरी होणारी तूट भरून काढण्यासाठी मनपाला आर्थिक बोजा सहनच करावा लागणार आहे. एकूणच बससेवेचा अंतिम अहवाल सादर करताना एकूण लागणारा खर्च तसेच अशा प्रकारची सेवा अन्य कोणकोणत्या शहरांनी घेतली आहे आणि तेथील स्थिती व ही सेवा कुणी चालविण्यास घेतली आहे याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी क्रिसीलला दिले आहेत. 

तुट भरून काढण्यासाठी हे पर्याय उपलब्ध

येणारी तूट भरून काढण्यासाठी क्रिसीलने विविध पर्याय सुचविले आहेत. त्यात अर्बन ट्रान्सफर फंड (युटीएफ) तयार करता येऊ शकतो. त्यानुसार नगररचना कायद्याअंतर्गत विकास शुल्कात वाढ करून तूट भरून काढण्यासाठी पैसा उभा करता येऊ शकतो. तसेच मुद्रांक शुल्कात वाढ करणे, मोटार व्हेईकल टॅक्समध्ये वाढ करणे, इंधनावर अधिभार लावणे अशा प्रकारच्या पर्यायांचा समावेश आहे. 

बससेवेसाठी प्राथमिक येणारा खर्च

मनपाने बससेवा ताब्यात घेतल्यास सुरूवातीला भांडवली खर्च म्हणून 116 कोटी रुपये उभे करावे लागतील. त्यात 205 बस घेण्यासाठी 92 कोटी, एका बसस्थानकासाठी 14 कोटी, अतिरिक्‍त बसथांबे व टर्मिनसकरता पाच कोटी, जीपीएस यंत्रणा सेलसाठी एक कोटी, व्यावसायिकरणासाठी चार कोटी. हीच सेवा मनपाने खासगीकरणाअंतर्गत खासगी संस्थेकडे सोपविल्यास 116 कोटींचा खर्च येणार नाही. 

असा होणार खर्च...

बससेवा चालविण्यासाठी प्रत्येक वर्षी येणार्‍या खर्चाचा अंदाज क्रिसिलने दिला आहे. हा खर्च कोटीमध्ये असा : 2018- 70 कोटी, 2019- 78.50, 2020- 86.50, 2021- 89, 2022- 94, 2023- 97, 2024- 101, 2025- 106, 2026- 111, 2027- 117 (यात मनुष्यबळ, बस देखभाल व इंधन खर्च, वाहन विमा व कर इ. चा समावेश आहे.) 

बससेवेतून असे येणार उत्पादन

बससेवेतून दरवर्षी येणारे उत्पादन किती असू शकते याबाबतही क्रिसीलने माहिती दिली आहे. उत्पन्न कोटीमध्ये असे : 2018- 46, 2019- 48, 2020- 50.37, 2021- 54, 2022- 63, 2023- 67, 2024- 72, 2025- 76, 2026- 89, 2027- 94.05 

वर्षनिहाय निर्माण होणारा तोटा (कोटीत) 

2018- 24, 2019- 30.26, 2020- 35.74, 2021- 32, 2022- 27.03, 2023- 26, 2024- 23, 2025- 22, 2026- 12.03, 2027- 10.50