Wed, Nov 14, 2018 08:04होमपेज › Nashik › नाशिकच्या अंदाजत्रकात ‘नवी मुंबई पॅटर्न’ दिसणार

नाशिकच्या अंदाजत्रकात ‘नवी मुंबई पॅटर्न’ दिसणार

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 15 2018 10:53PMनाशिक : प्रतिनिधी

प्रशासकीय पातळीवर मनपा अंदाजपत्रक तयारीचे काम सुरू असतानाच अचानकपणे आयुक्‍तांच्या बदलीत फेरबदल झाले. यामुळे आता अंदाजपत्रकातही अनेक बदल होण्याचा संभव असल्याने नाशिकच्या अंदाजपत्रकात नवी मुंबई पॅटर्नची छाप दिसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई मनपातून भाषणासह विविध माहिती अधिकार्‍यांना मागविण्याचे आदेश देत त्याप्रमाणेच अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

फेब्रुवारीअखेर महापालिकेचे अंदाजपत्रक तयार होऊन आयुक्‍तांकडून ते स्थायी समितीला मंजुरीसाठी सादर केले जाते. त्यासाठी एक महिन्यापासून मनपातील विविध खातेप्रमुखांकडून अंदाजपत्रकासाठी तयारी केली जात आहे. विभागनिहाय योजना, विविध विकासकामे व त्यासाठी लागणारी तरतूद याबाबत माहितींची देवाण घेवाण केली जात आहे. बैठकांवर बैठका होत आहेत. तत्कालीन आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी याबाबत खातेप्रमुखांच्या बैठका घेऊन अंदाजपत्रक तयार केले. चालू आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक 1410 कोटींचे होते. त्यात 40 कोटींची वाढ होऊन हेच अंदाजपत्रक 1450 कोटींपर्यंत पोहोचले आहे.

तर सन 2018-19 चे अंदाजपत्रक जवळपास 1600 कोटींपर्यंत जाण्याचे संकेतही देण्यात येऊन त्यानुसार अंदाजपत्रकाचे काम सुरू होते. केवळ छपाई बाकी होती. अशातच आयुक्‍तांची बदली झाल्याने ही प्रक्रिया काहीशी थंडावली होती. परंतु, नवनियुक्त आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार हाती घेऊन पुन्हा अंदाजपत्रकाला चालना दिली असून, त्यात अनेक बदल खातेप्रमुख तसेच लेखा व वित्त विभागाला सुचविले आहेत. तसेच नवी मुंबई येथे आयुक्‍त म्हणून कारभार पाहताना त्यांनी अंदाजपत्रकासाठी तयार केलेल्या भाषणाची प्रत मागवून त्यानुसार नाशिक मनपाच्या अंदाजपत्रकात त्याचा अंतर्भाव करण्याच्या सूचनाही अधिकार्‍यांना केल्या आहेत. यामुळे नाशिकच्या अंदाजपत्रकात नवी मुंबई मनपाच्या अंदाजपत्रकाची छाप दिसून येऊ शकते.