Fri, Apr 19, 2019 12:09होमपेज › Nashik › भाजपा नगरसेवकांना आमदारांच्या कानपिचक्या

भाजपा नगरसेवकांना आमदारांच्या कानपिचक्या

Published On: Dec 11 2017 1:59AM | Last Updated: Dec 11 2017 1:46AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

पक्षात राहून पक्षातीलच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची अडचण करणार्‍या नगरसेवकांना आमदार बाळासाहेब सानप यांनी महापौरांच्या रामायण निवासस्थानी कानपिचक्या देत कारभार सुधारण्यास आणखी एक संधी दिली. याच काही नगरेसवकांनी मनसेच्या काळात महापौर अशोक मुर्तडक यांच्याशीही वाद घालत आपला रुबाब दाखविण्याचा प्रयत्न केला होता. 

महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. यामुळे कोणतेही कामकाज वा निर्णय घेताना या सत्तारूढ पक्षाला अडचणी येण्याचा प्रश्‍नच नाही. परंतु, पक्षातच अनेकजण घरभेदी असल्याने विरोधकांना त्याचा फायदा होत आहे. स्थायी समितीत विरोधकांशी हात मिळवणी करत भाजपातील काही सदस्यांनी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनाच अडचणीत आणण्याचे काम केले होते. बिटको रुग्णालयातील विकास कामे व मशिनरी खरेदी तसेच स्थायी समितीच्या याआधी झालेल्या सर्वच इतिवृत्तांना या नगरसेवकांनी विरोध केला होता. यामुळे भाजपाला नगरसेवकांकडूनच घरचा आहेर अशी वार्ता पसरल्याने आ. सानप यांनी त्यावेळी देखील संबंधितांना समज देऊन या विषयावर पडदा पाडला होता.

त्याबाबत आमचा इतिवृत्ताला विरोध नव्हता केवळ बिटको रुग्णालयाची पाहणी करायची होती, असे कारण देत संबंधितांनी आपली मान सोडविली होती. त्यानंतर पेलिकन पार्कसंदर्भात आमदार सीमा हिरे यांच्यावरही भाजपाच्या याच नगरसेवकांनी निशाना साधत अंतर्गत वाद समोर आणला होता. याबाबत आ. हिरे आणि महेश हिरे यांनी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गेल्या आठवड्यात आ. सानप यांनी या नगरसेवकांना महापौर रंजना भानसी यांच्या रामायण निवासस्थानी बोलावून घेतले. तिथे सानप यांनी संबंधितांना कानपिचक्या देत पुन्हा तक्रारी आल्यास शिस्तभंगाची कारवाई करेन, असा इशारा दिला आहे.