Wed, Nov 14, 2018 08:50होमपेज › Nashik › एनपीसीए जाणार व्यापार्‍यांच्या दारात 

एनपीसीए जाणार व्यापार्‍यांच्या दारात 

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 06 2018 11:32PMनाशिक : प्रतिनिधी

नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीए) राबविलेल्या भीम यूपीआय नोंदणीला सलग दुसर्‍या दिवशी व्यापार्‍यांचा अल्प प्रतिसाद लाभला. मंगळवारी केवळ 56 व्यापार्‍यांची नोंदणी झाली. दरम्यान, या उपक्रमाचे अयपश बघता दुसर्‍या टप्प्यात थेट व्यापार्‍यांच्या दारीच जाण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व एनपीसीएने घेतला आहे. नोटाबंदीनंतर देशात डिजिटल व्यवहारांकडे नागरिक वळावे यादृष्टीने केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने एनपीसीएच्या माध्यमातून व्यापार्‍यांसाठी खास भीम यूपीआय नोंदणी उपक्रम आणला आहे. या उपक्रमांतर्गत व्यापार्‍यांना एक क्यूआर कोड दिला जाणार आहे.

हा कोड व्यापार्‍यांनी दुकानात दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. कोडच्या माध्यमातून ग्राहक थेट व्यापार्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकतात. देशात नाशिकमध्ये पहिल्या टप्प्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून भीम यूपीआय नोंदणी उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही नोंदणी मोफत आहे. 

गेल्या दोन दिवसांमध्ये मात्र या उपक्रमाला व्यापार्‍यांचा थंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नाशिकरोड येथील सिंधी भवनमध्ये मंगळवारी दिवसभरात केवळ 56 व्यापार्‍यांनी नोंदणी केली. सोमवारी (दि.5) केवळ 95 व्यापार्‍यांनी नोंदणी करत क्यूआर कोड घेतला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच सिडको येथील अतुल डेअरीजवळील स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी बुधवारी (दि.7) नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने भीम यूपीआय नोंदणी उपक्रम हाती घेतला रआहे. देशात नाशिकमध्ये पायलट प्रकल्प म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एनपीसीएद्वारे सुरू असलेल्या नोंदणी मोहिमेत व्यापार्‍यांना मोफत नोंदणी केली जात आहे. जास्तीत जास्त व्यापार्‍यांनी याचा फायदा घ्यावा. यापुढील टप्प्यात मोबाइल व्हॅनद्वारे व्यापार्‍यांपर्यंत पोहचून याबाबत जनजागृती केली जाईल.

- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी