Sat, Jul 20, 2019 13:45होमपेज › Nashik › औरंगाबाद महामार्ग हस्तांतरणास नकार 

औरंगाबाद महामार्ग हस्तांतरणास नकार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावरील आडगाव नाका ते मानूर नाकापर्यंतचे भूसंपादन अद्याप झालेले नसल्याने मनपाने हा पाच किमीचा रस्ता हस्तांतरण करून घेण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास नकार दिला आहे. महापालिकेने रस्ता हस्तांतरण करून घेतला असता तर मनपावर 400 कोटींचा अतिरिक्त बोजा पडला असता. 

रस्ता हस्तांतरणाविषयी मनपाला मागील महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र प्राप्त झाले होते. त्यावर नगरसेवक उध्दव निमसे, पूनम सोनवणे, शितल माळोदे, सुरेश खेताडे यांनी देखील रस्ता हस्तांतरण करून घेण्यास नकार दर्शवित तसे पत्र मनपा प्रशासनाला सादर केले होते. राज्य महामार्गावरील आडगाव नाका ते मानूर जकात नाकापर्यंतच्या रस्त्याचे अजून भूसंपादन झालेले नाही. रस्त्याचे भूसंपादन करण्याकरता सुमारे 400 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. तसेच या रस्त्याचे सहा सात वर्षांपासून डांबरीकरण देखील झालेले नाही. त्यावर बहुतांश ठिकाणी खड्डे पडलेले आहे. यामुळे डांबरीकरणासाठी देखील 15 ते 20 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. सध्या मनपाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यात मनपाचा उत्पन्नाचा स्त्रोत असलेले मार्गही बंद झाल्याने निधी उपलब्ध होऊ शकणार नाही. यामुळे 400 कोटीएवढा निधी राखीव ठेवणे मनपाला परवडणारे नाही. यामुळेच मनपा प्रशासनाने देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून रस्ता हस्तांतरण करून घेण्यास नकार दर्शविला आहे.