होमपेज › Nashik › नाशिकमधील 60 हजार मालमत्तांवर वाढीव कर

नाशिकमधील 60 हजार मालमत्तांवर वाढीव कर

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 04 2018 12:13AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

मालमत्ता सर्वेक्षणात आढळून आलेल्या सुमारे 60 हजार मालमत्तांवर 40 टक्के वाढीव कर आकारणी करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. प्रशासनाने सादर केलेल्या या प्रस्तावाचे सदस्यांनी स्वागत करत रिडेव्हलपमेंटच्या इमारतींना आणि गावठाणातील बांधकामांना त्यातून वगळण्याची मागणी केली. मूल्यनिर्धारण आणि विविध कर विभागाने महासभेत करवाढीचा प्रस्ताव सादर केला. मालमत्ता सर्वेक्षणात 60 हजार नवीन मालमत्ता आढळून आल्या आहेत. यातील बहुतांश मालमत्तांकडून मनपाकडे मालमत्ता कर भरला जात नव्हता. यामुळे अशा मालमत्तांकडूनच (जुन्या नव्हे) वाढीव कर वसूल केला जाणार असल्याचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावाचे वाचन सुरू असतानाच आयुक्तांच्या सूचनेनुसार असा शब्द त्यात आल्याने त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला. आयुक्तांना करवाढीचे अधिकार असेल तर प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी कशासाठी ठेवला असा प्रश्‍न गुरुमित बग्गा यांनी उपस्थित केला. दिनकर पाटील यांनीही प्रस्तावातील संबंधित शब्दास आक्षेप घेत त्यात दुरुस्ती करण्याची सूचना केली. जुने नाशिक व पंचवटीत क्लस्टर डेव्हलपमेंटचे काम मनपाने हाती घ्यावे. तसेच निळ्या पूररेषेतील अनेक जुनी बांधकामे मोडकळीस आलेली आहेत. अशा ठिकाणी नवीन बांधकामे झाल्यास तेथील मालमत्ताधारकांना करात सवलत देण्याची मागणी गजानन शेलार, शाहू खैरे व अजिंक्य साने यांनी केली.

एकाच वेळी 40 टक्के करवाढ करण्याऐवजी त्याबाबत फेरविचार करण्याची सूचना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी करत प्रस्तावाचे स्वागत केले. अनेक वर्षांपासून मनपाचा कर चुकविणार्‍या मालमत्तांवरच वाढीव कराचा बोजा पडणार असून, त्यातून मनपाला जवळपास 10 ते 15 कोटींचा महसूल मिळणार असल्याचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी सांगितले.