Fri, Jan 18, 2019 04:42होमपेज › Nashik › जिल्ह्यात तब्बल सात लाख व्यसनाधीन

जिल्ह्यात तब्बल सात लाख व्यसनाधीन

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 04 2018 12:09AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

राज्य शासनातर्फे राज्यभरातील 30 वर्षांवरील व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यात सात लाख 12 हजार 831 नागरिकांना मद्य तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. या तपासणी मोहिमेत नाशिक जिल्ह्यात 25 लाख 84 हजार 823 नागरिकांची मौखिक तपासणी करण्यात आली. राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. 

संपूर्ण राज्यात 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत 30 वर्षांवरील नागरिकांची मौखिक तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील 22 लाख 1 हजार 454 नागरिकांनी स्वत:हून तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी केली. तर आरोग्य विभागाच्या सरकारी कर्मचार्‍यांनी दोन लाख 92 हजार 456 व खासगी आरोग्य कर्मचार्‍यांनी 90 हजार 913 नागरिकांपर्यंत जाऊन त्यांची मौखिक तपासणी केली आहे. चार हजार 395 नागरिकांच्या तोंडातील त्वचा जाडसर होती, 727 रुग्णांचा पंधरा दिवसांहून जास्त दिवस बरा न होणारा चट्टा आढळून आला आहे. 

शासकीय, महापालिका, नगरपालिका दवाखान्यांमध्ये मोफत मौखिक तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. या मोहिमेत आठ हजार 894 नागरिकांना उपचारासाठी संदर्भित केले असून, या रुग्णांवर पुढील सहा महिन्यांच्या आत अंतिम निदान करून उपचार करण्यात येणार आहेत