होमपेज › Nashik › अवलिया शिक्षकाने संपूर्ण गावालाच केले शहाणे

अवलिया शिक्षकाने संपूर्ण गावालाच केले शहाणे

Published On: Jul 15 2018 3:21PM | Last Updated: Jul 15 2018 3:21PMनाशिक : जिजा दवंडे

सुविधा नसलेल्या गाव, पाड्यावर नियुक्ती मिळाल्यास शहरी भागात आणि त्यातही घरापासून जवळ बदली करून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, राजकारण्यांचे उंबरठे झिजविणारे अनेक शिक्षक आपल्या आवती-भोवती सहज दिसून येतात. मात्र, अत्यंत मागास गावात बदली करून घेत अवघ्या चार वर्षांत तेथील विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण गावालाच शहणे करण्याची किमया नाशिक जिल्ह्यातील राजेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पंकज दशपुत्रे यांनी साधली आहे. त्यामुळे कधीकाळी मागास आणि उणाड म्हणून ओळखले जाणारे हे गाव आदर्श गाव म्हणून नावारूपाला येऊ पाहत आहे.

Image may contain: 1 person, sitting

नाशिक तालुक्यातील राजेवाडी हे त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगरमाळावर बसलेलं बाराशे लोकवस्ती असलेला गाव. वनराई लाभल्याने निसर्ग संपन्न आहे. नाशिक शहरापासून जवळ असतानाही या गावाला शहराचा फारसा गंध नव्हता. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, राहणीमान या सगळ्याच बाबतीत गाव कोसे दूर होते. नेमक्या याच उणिवा हेरून शिक्षक दशपुत्रे यांनी आपल्या शिक्षक कारकिर्दीतील तीन-चार वर्षाचा काळ कळवण तालुक्यात घालविल्यानंतर थेट जिल्हा परिषदेकडून राजेवाडी येथे बदली करण्याची विनंती केली. 31 ऑक्टोबर 2013 मध्ये राजेवाडीत गेलेल्या या अवलिया शिक्षकाने येथील जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून शाळेबरोबरच गावात अमुलाग्र बदल अनुभवायाव येत आहेत. विशेष म्हणजे दशपुत्रे यांनी गाव सुधारणेची कुठल्याही सरकारी निधीवर विसबून  न राहता सामाजिक संस्था, संघटनांच्या मदतीने ही किमया केली आहे. त्याचा हा शाळेबरोबरच गाव सुधारणेचा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

Image may contain: one or more people, people on stage and indoor

स्वच्छतेसाठी दिले 11 रुपयांचे नियमित बक्षीस
शिक्षणाचे महत्व पटवून देतानाच शाळेत येणारी मुले टापटीप यावीत त्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी दशपुत्रे यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेतच दररोज एक स्वच्छ, सुंदर नावाचा उपक्रम सुरु केला. यामध्ये दररोज एका स्वच्छ आणि टापटीप आलेल्या विद्यार्थ्याला अकरा रूपयांचे बक्षीस सुरू केले. त्यासाठी अनेक दिवस स्व:ताच्या खिशातून तर हळूहळू गावातीलच नागरिकांना बोलावून त्यांच्याकडून स्वच्छ विद्यार्थ्याची निवड करून बक्षीस देण्यात आले. तसेच या अकरा रूपयातून दहा रूपयांची साबण आणि एक रूपयांचे चॉकलेट हा नियम घालून दिला.  त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छते विषयी आवड झाली आहे.

व्यसनमुक्‍तीच्या उंबरठ्यावर
राजेवाडीचा संपूर्ण परिसर वनराईचा असल्याने या भागात मोह प्रजातीची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यापासून निर्माण होणार्‍या दारूचे व्यसन केवळ येथील मोठ्यानाच नाही, तर लहान मुलांनाही चांगलेच जडलेले होते. मात्र, याबाबतही घरोघरी जावून व्यसनामुळे होणारे दुष्षपरिणामाबाबत माहिती देत त्यांनी संपूर्ण गावालाच व्यसनमक्तीच्या मार्गावर नेले आहे. आता गावातील मोठी माणसेही मोहाच्या मोहापासून दूर होऊन झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

स्वच्छतेचे हळदी-कुंकू
पंकज दशपुत्रे यांनी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे धडे देतानाच गावालाही चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेचे धडे दिले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आई विजया दशपुत्रे यांना बरोबर घेऊन गावात स्वच्छतेचे हळदी-कुंकू हा उपक्रम सुरु केला. यामध्ये गावातील महिलांना एकत्र करून विविध संस्थाच्या माध्यमातून येथील महिलांना हळदी-कुंकासोबत स्वच्छतेची किट भेट दिली. यामध्ये साबण, शाम्पू, तेल अशा स्वच्छतेबाबतच्या साधनांचा समावेश केला. अशा नियमित कार्यक्रमातून प्रत्येक घरात स्वच्छतेची किट पाहचल्याने गावातील गावकर्‍यांना आपोआपच स्वच्छतेची गाडी निर्माण होण्यास मदत होत आहे. हा उपक्रम प्रत्येक महिन्याला घेतला जात आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती
अज्ञानामुळे गावात मोठ्या प्रमाणावर अंधश्रध्दा जोपासली जात असल्याची बाब लक्षात आल्याने दशपुत्रे यांनी राजेवाडीसह परिसरातील अन्य बुवा-बाबांना एकत्र आणून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचे चमत्काराचे कार्यक्रम घेऊन अंधश्रद्धा कमी करण्यासाठी प्रयत्न केले. असे कार्यक्रम सातत्याने होत असल्याने अंधश्रद्धा कमी करण्यात त्यांना बर्‍याच अंशी यश आले आहे. त्यामुळे गावातील महिला आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाल्या आहेत.

पत्र्याच्या शाळेचे इमारतीत रूपांतर
गावाला शाहणपणाचे धडे देतानाच दशपुत्रे यांनी शाळाची गुणवत्ता सुधारत भौतिकदृष्ट्या कायापालत केला आहे. शाळेत रुजू झाल्यानंतर पत्र्यांच्या दोन खोल्यामध्ये भरणारी शाळा मुबंई येथील एम्पथी फाऊंडेशनच्या मदतीने इमारतीत रूपांतरित झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसायलाही नीटशी जागा नसलेल्या राजेवाडी शाळेच्या चार खोल्या डिजिटल झाल्या आहेत. तर एक संपूर्ण खोली कॉम्प्युटर रूम बनविण्यात आली आहे. या ठिकाणी 12 संगणकांवर विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. तर एका खोलीत सुसज्ज कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे खासगी शाळेला लाजवेल असे रूप या जि.प. शाळेचे पालटले आहे.

विद्यार्थ्यांची मनी बँक
पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी शाळेतच विद्यार्थ्यांची बँक सुरु करण्यात आली आहे. या बँकेत विद्यार्थी आपल्याकडे आलेले खाऊसाठी असलेल्या पैशातील काही पैसे बँकेत ठेवतात. हे जमा झालेले पैसा विद्यार्थ्यांना पाचवीनंतर शाळा सोडताना बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजासहीत परत केले जातात. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी या पैशांचा त्यांना उपयोग होतो. तसेच विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागत आहे.

गावकर्‍यांच्या स्वयंरोजगारासाठी प्रयत्न
गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाल्यास आर्थिक उन्‍नती होऊनच गावाची प्रगती होणार असल्याची जाणीव झाल्याने दशपुत्रे यांनी गावातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी महिला बचत गट स्थापन करून त्र्यंबकेश्‍वर येथे होमहवनसाठी लागणार्‍या जंगली वनस्पतीच्या काड्या जमा करून  त्या पुजाविधीसाठी विक्रीचा प्रस्ताव त्र्यबंकेश्‍वर देवस्थानाला दिला आहे. यामुळे गावातूनच पर्यावरणाचा र्‍हास न करता पडलेल्या गाड्यातून आर्थक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. यातून गावकर्‍यांची मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

खुले ग्रंथालय संकल्पना

No automatic alt text available.
शाळेत खुले ग्रंथालय संकल्पना राबविण्यात आली असून हे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी नियमित खुले ठेवले जाते. येथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने हवी ती पुस्तके घेता येतात. घेतलेली पुस्तके विद्यार्थी वाचन झाल्यानंतर परत आणून ठेवतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्‍वास वाढीस लागण्यास मदत झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाशिवास इतर पुस्तके वाचनाची गोडी निर्माण झाली आहे.

शाळेसाठी एक कुंडी उपक्रम

Image may contain: 2 people, people smiling, people standing and stripes
शाळा परिसरात वृक्षलागवड करतानाच रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक कुंडी राजेवाडी शाळेसाठी उपक्रम राबवून शहरातील विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून अनेक सुंदर वृक्षवेलींची कुंड्या मिळविल्या आहेत. त्यामुळे शाळेत चांगली बाग फुलली आहे.

शिकारी मुलांना लावली शाळेची गोडी

Image may contain: 2 people, people smiling, people standing and outdoor

आदिवासी समाज असल्याने येथील बहुतेक मुले शाळेत न जाता परंपरागत पध्दतीने जंगल भागात फिरून शिकार करण्यात धन्यता मानत होती. त्यासाठी पालकांकडूनही मुलांना शाळेचा फारसा आग्रह होत नव्हता. त्यामुळे गावात असलेली जिल्हा परिषदेची शाळा असूनही नसल्यागत होती. मात्र, शिक्षक दसपुत्रे यांनी राजेवाडीत आल्यानंतर येथील समाजिक परिस्थितीचा अभ्यास करत तेथील मुलांशी गट्टी जमवून त्यांना शाळेसाठी प्रवृत्त केले. प्रत्येक कुटुंबात जावून शाळेचे आणि शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे हळूहळू येथील बहुसंख्य मुले शिकार सोडून शाळेकडे वळली.

देशाची प्रगती साधताना कुठलाही घटक मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवता येणार नाही, शहरी आणि ग्रामीण भागातील विशेषता आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, रोजगार याबाबत असलेले मागासलेपण विचार करावला लावणारे आहे. राजेवाडी हे गाव यापैकीच एक आहे. मात्र, केवळ सरकारी योजनांची वाट पाहत बसून या गावांचा कायापालट होणार नाही यांची जाणीव झाल्याने स्व:ता या गावात नियुक्तीची मागणी करून शाळेबरोबरच गावच्या सर्वार्गिण प्रगतीसाठी प्रयत्न करत आहे. येत्या काही वर्षात राजेगाव आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाईल यांचा पूर्ण विश्‍वास आहे. त्याषवष्टीने काम गरत आहे.
- पंकज दशपुत्रे, शिक्षक, 
जि.प. शाळा. राजेवाडी, ता. नाशिक