Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Nashik › नाशिक : पोलिस आयुक्तालयासमोर सिटूचे साखळी उपोषण 

नाशिक : पोलिस आयुक्तालयासमोर सिटूचे साखळी उपोषण 

Published On: Jun 18 2018 6:07PM | Last Updated: Jun 18 2018 6:06PMसातपूर : प्रतिनिधी

कंपनी मालकांना सहाय्य करत आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या पोलिस उपायुक्त लक्ष्मिकांत पाटील यांचे निलंबन करत, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्यासह अन्य कामगारांवर सुडबुध्दीने दाखल केलेले गुन्हे मागे घ्या या प्रमुख मागण्यांसाठी सीटूने सोमवारी (दि.१८) नाशिक पोलिस आयुक्तालयासमोर साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. कार्यवाही न झाल्यास पंधरा दिवसानंतर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये बेमुदत संप पुकारण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन ही संघटना नाशिक शहरात व जिल्ह्यात कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी सुप्रसिध्द युनियन आहे. कुठलीही "सेटलमेंट" न करता कामगारांना न्याय मिळवून दिला जात असल्याने मालक वर्गात युनियनप्रती प्रचंड चिड आहे. गेल्या अनेक वर्षापासून सिटू युनियन संपवण्याचा डाव उद्योजकांकडून खेळला जात आहे. 

दरम्यान, महिनाभरापुर्वी नॅशग्रुपच्या सिअर्स कंपनी कामगार प्रविण मेहेतकर यांस नॅश ग्रुपच्याच सिम इंजिनिअरींग मधील इतर कामगारांनी मारहाण केली होती. या वादात डॉ.कराड यांचा कुठलाही संबध नसतांना कंपनी मालकांनी पोलिस प्रशासनाला हाताशी धरत डॉ.कराड यांचे नाव गोवले आहे. नॅश ग्रुपच्या एकूण दहा कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये किमान वेतनासह कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्यामुळे नॅश ग्रुपच्या दहापैकी चार कंपन्यांमधील कामगारांनी सिटूचे नेतृत्व स्विकारले आहे. युनियनच्या पाठपुराव्याने कंपनी व्यवस्थापनाला कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा द्याव्या लागल्या. त्यामुळे कंपनीच्या नफ्यातील १९ लाख १७ हजार ६६० रुपये कामगारांना वाटप करावे लागले. त्याचा राग कंपनी मालकाच्या मनात असल्याने त्यांनी हा डाव खेळला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवूनही कार्यवाही करण्यात आली नाही. यावेळी सिटू पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन सादर केले. यावेळी सिताराम ठोंबरे,श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, कल्पना शिंदे, संतोष काकडे, अॅड.भुषण साताळे, भिवाजी भावले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.