नाशिक : प्रतिनिधी
वाढदिवस म्हटला की, हल्ली ढोल-ताशे, हार-तुरे, फटाके आणि फलकबाजी अशा निरर्थक गोष्टींवर खर्च केला जातो. मात्र, या सर्व वायफळ खर्चाला फाटा देत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे यांनी आपल्या वाढदिवशी दिव्यांग कुटुंबातील दोन मुलींना दत्तक घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
सीबीएस येथील हुतात्मा स्मारकात अत्यंत साध्या पद्धतीने या दत्तक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक पंडित येलमामे, तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंत हुदलीकर होते. या सर्वांच्या उपस्थितीत भडांगे यांनी एका अंध दाम्पत्याच्या मुलीला आणि दुसर्या एका गतिमंद मुलीला दत्तक घेतले. यातील पहिली मुलगी मयूरी चौधरी ही पंचवटीतील पेठरोड येथील रहिवासी असून, सध्या ती पंचवटी माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे मयूरी ही नॅशनल पॅरालिम्पिक स्विमर आहे. तर दुसरी मुलगी सिद्धी विजय गोसावी हीदेखील पंचवटीतीलच असून, पेठे विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. या दोन्हीही मुलींचा आयुष्यभरासाठी शिक्षण, आजारपणासह सर्व खर्च करण्याचा संकल्प भडांगे यांनी यावेळी जाहीर केला. प्रहारचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांनीही या स्तुत्य उपक्रमाचे कौतूक केले. या मुलींच्या कुटुंबियांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके तसेच प्रकाश बर्वे, प्रकाश चव्हाण, महेश थोरात, सचिन पानमंद, नितीन गवळी, अजित आव्हाड, शब्बीर आरसीवाला, जगन काकडे, श्याम गोसावी, योगेश शिंदे, भारती चौधरी, सचिन पाटील सचिन भडांगे, शोएब सिद्दिकी, पंकज यादव आदी मान्यवर उपस्थित होते. भगवान येलमामे यांनी सूत्रसंचालन केले, तर किशोर येलमामे यांनी आभार मानले.