Fri, Apr 26, 2019 09:53होमपेज › Nashik › नाशिक पर्यटन विकास  प्रकल्पास तत्त्वतः मंजुरी 

नाशिक पर्यटन विकास  प्रकल्पास तत्त्वतः मंजुरी 

Published On: Jun 15 2018 11:48PM | Last Updated: Jun 15 2018 11:41PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहर पर्यटन विकास प्रकल्प प्रस्तावास नाशिक स्मार्ट सिटीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. सुमारे 100 कोटींहून अधिक रकमेचा हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे. 

नाशिक मनपाच्या सभागृहात आयोजित बैठकीत शहर पर्यटन विकासाविषयी सादरीकरण करण्यात आले. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे तसेच केपीएमजी संस्था आणि पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरासह परिसरातील पर्यटन स्थळांचा विकास कसा करता येऊ शकतो आणि त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रामायण सर्किट या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत  सीतागुंफा, तपोवन, रामकुंड, कपिलतीर्थ, अंजनेरी, रामशेज, म्हसरूळ येथील सीता सरोवर अशा 11 ठिकाणांचा पर्यटन स्थळात समावेश करून विकास केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासंदर्भात पुढील आठवड्यात मनपा आणि पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांची बैठक होऊन त्यात आर्थिक तरतुदीविषयी माहिती घेतली जाणार आहे. पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत वाईनयार्ड, अ‍ॅडव्हेंचर पार्क, मार्केटिंग, इंटिग्रेटेड डिजिटल प्रेझेन्स, स्टोरी टेली पब्लिसिटी, दिशादर्शक फलक आदींचा समावेश केला जाईल. त्याचप्रमाणे शहरातील पर्यटनस्थळांविषयी माहिती देण्यासाठी नेमल्या जाणार्‍या टूरगाईड व टूर ऑपरेटर्सना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर उभारणार

पर्यटन विकास प्रकल्पांविषयी शहरात येणारे भाविक आणि पर्यटक यांना माहिती व्हावी यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि तपोवन याठिकाणी टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यात संबंधित स्थळांची अद्ययावत माहिती ठेवली जाणार आहे. तसेच मनपा आणि राज्य शासनाचे संकेतस्थळ तसेच मोबाइल अ‍ॅपवरदेखील ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.