Sun, Sep 23, 2018 06:35



होमपेज › Nashik › नाशिक शिक्षक मतदार संघात पालघरची पुनरावृत्ती होईल: गिरीश महाजन

नाशिक शिक्षक मतदार संघात पालघरची पुनरावृत्ती होईल: गिरीश महाजन

Published On: Jun 04 2018 4:03PM | Last Updated: Jun 04 2018 4:03PM



नाशिकरोड वार्ताहर

पालघर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीने मोठ्या फरकाने विजय मिळविला. या निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती नाशिक शिक्षक मतदार संघात पाहायला मिळेल, त्याचप्रमाणे नाशिकच्या विजयाने भाजपचा विधान परिषदेत बहुमताचा आकडा वाढेल, असा आत्मविश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. नाशिक शिक्षक मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिकेत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचारसभेचे आयोजन नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी महाजन बोलत होते.

महाजन म्हणाले की, पालघर निवडणूक म्हणजे भाजपचे नवीन व्हर्जन आहे. पालघर व्हर्जनचा पुरेपूर  वापर शिक्षक निवडणुकीत करून घ्यावा, विजय निश्चित भाजप उमेदवाराचा होईल. भाजपने चार वर्षात जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत . त्याचा उपयोग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत होईल. भाजपला निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची आहे. कार्यकर्त्यांचे मोठे संघटन भाजपकडे असून त्यांच्या जोरावर भाजप  विजयश्री खेचून आणेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यमंत्री विजय रावल म्हणाले की , नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, जळगांव आणि धुळे जिल्ह्यात भाजपची शक्ती आणि संघटन असून सत्तेत असताना महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.  त्यामुळे भाजपचा विजय निश्चित होईल. भाजपचे उमेदवार अनिकेत पाटील यांनी भाजप शासनावर शिक्षकांचा विश्वास आहे त्यामुळे शिक्षक मतदारसंघात भाजपला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रचार सभेनंतर भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनिकेत पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसूल आयुक्त राजाराम माने यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

विधान परिषदेतील बहुमताकरिता  नाशिक शिक्षक मतदार संघातील विजय महत्त्वपूर्ण असल्याचे मत गृहराज्यमंत्री  राम शिंदे यांनी व्यक्त केले.भाजपचे विधानसभेत बहूमत आहे. मात्र विधान परिषदेत बहूमत नाही. विरोधक जनहिताच्या अनेक विधेयकाला विरोध करतात.विधेयक पास होऊन देत नाहीत. त्यामुळे चांगले निर्णय घेऊन देखील त्याचा उपयोग होत नाही. याकरिता निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावावी , असे आवाहन त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना केले.

यावेळी व्यासपीठावर गृहराज्यमंत्री राम शिंदे , राज्यमंत्री जयकुमार रावल , खासदार हरीचंद्र चव्हाण , आमदार सीमा हिरे , आमदार देवयानी फरांदे , जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर , महापौर रंजना भानसी , मनपा स्थायी सभापती हिमगौरी आहेर, उदय वाघ , बबन चौधरी , भानुदास बेरड , दिनकर पाटील , संभाजी मोरुस्कर , बाजीराव भागवत , शांताराम घंटे, शरद आहेर  आदीसह पाच जिल्यातील पदाधिकारी उपस्थित होते.