Fri, Apr 26, 2019 17:28होमपेज › Nashik › पत्नीला जाळून मारणार्‍यास जन्मठेप 

पत्नीला जाळून मारणार्‍यास जन्मठेप 

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 24 2018 12:34AMनाशिक : प्रतिनिधी 

घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जाळणार्‍या पतीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि.23) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राष्ट्रपाल आनंदा धाबो (27, रा. कवठेकरवाडी, पांडवलेणी, पाथर्डी फाटा)  असे या आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. शिरीष कडवे यांनी या खटल्यात नऊ साक्षीदार तपासले. मूळ हिंगोली जिल्ह्यातील धाबो कुटुंबीय पाथर्डी फाटा येथे रोजगारानिमित्त राहात होते. राष्ट्रपाल आणि त्याची पत्नी रमा दोघेही संसाराचा गाडा ओढत असताना 7 जानेवारी 2016 रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर राष्ट्रपालने पत्नीला मारहाण केली.

यामुळे पत्नी रमा हिने घरातील  कॅनमधील डिझेल अंगावर ओतून घेत जाळून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर राष्ट्रपाल याने पुन्हा पत्नीला शिवीगाळ करून रमाला पेटवून दिले. अंगावरील साडीने पेट घेतल्याने रमाने जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. राष्ट्रपालने घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक जमल्याने त्याने रमाला वाचवण्यास सुरुवात केली. या घटनेत रमा 90 टक्के जळाल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी राष्ट्रपाल विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. मृत्यूपूर्वी रमाने तिच्या भावास पतीने पेटवल्याचे सांगितले होते. मात्र, दंडाधिकार्‍यांना जबाब देताना तिने स्टोव्हचा भडका झाल्याने पेटल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा पोलिसांकडे मृत्यूपूर्व जबाबात पती राष्ट्रपाल याने पेटवून दिल्याचे सांगितले.