Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › ग्रहणकाळात ‘देऊळ बंद’; स्नानासाठी रामकुंडावर गर्दी (Video)

ग्रहणकाळात ‘देऊळ बंद’; स्नानासाठी रामकुंडावर गर्दी (Video)

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:27PMपंचवटी : वार्ताहर

खग्रास चंद्रग्रहण काळात शहरातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती, तर ग्रहण संपल्यानंतर भाविकांनी गोदावरी नदीतील रामकुंडात स्नान आणि धार्मिक विधीसाठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत रामकुंडावर भाविकांचा ओघ सुरूच होता.  

तब्बल  152 वर्षांनंतर बुधवारी (दि.31) चंद्र पृथ्वीपासून 3 लक्ष 59 हजार किलोमीटर अंतरावर आला होता. त्यामुळे या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसत होते. या प्रक्रियेलाच खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या ग्रहणकाळात नदीत स्नान करणे शुभ मानले जाते. चंद्रग्रहण काळात नदीवर स्नान केल्याने मोक्षप्राप्ती मिळते, तसेच स्नान, दान, होम, तर्पण, श्राद्ध, मंत्रोच्चार केल्याचेही पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच बुधवारी (दि.31) रात्री उशिरापर्यंत भाविकांनी स्नान आणि धार्मिक विधींसाठी गर्दी केली होती. 

अनेक भाविकांनी गोदावरी नदीत स्नान करुन पूजापाठ करीत मंत्र जप केले. यामध्ये महिला, पुरुष आणि तृतीय पंथीयांचादेखील समावेश होता. ग्रहण काळात गंगाघाट परिसरातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली होती.

पुन्हा हा योग कधी? 

आता यानंतर 26 मे 2021 रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल. 31 डिसेंबर 2028 रोजी ब्ल्यूमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल. दि. 31 जानेवारी 2037 रोजी पुन्हा तिहेरी योग आल्याने सुपर-ब्ल्यू-ब्लड मूनचे दर्शन घेता येईल. 152 वर्षांपूर्वी 31 मार्च 1866 रोजी असाच चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमून दर्शनाचा योग आला होता, असे जाणकार सांगतात.