Tue, Feb 19, 2019 12:09होमपेज › Nashik › नाशिक : विषय समिती सभापती बिनविरोध होणार

नाशिक : विषय समिती सभापती बिनविरोध होणार

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 25 2018 12:01AMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदांसाठी मंगळवारी (दि.24) नगरसचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. चारही समित्यांसाठी केवळ एक-एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक होण्यापूर्वीच सभापती व उपसभापतिपदाची ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यामुळे प्रभाग समित्यांबरोबरच विषय समित्यांवरही भाजपाचाच दबदबा आहे. येत्या 26 एप्रिल रोजी महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, वैद्यकीय व आरोग्य समिती तसेच शहर सुधारणा समिती या चार समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदांच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यात महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी कावेरी घुगे, उपसभापतिपदासाठी सीमा ताजणे, विधी समिती सभापतिपदासाठी सुनीता पिंगळे, उपसभापतिपदाकरिता सुमन सातभाई, वैद्यकीय आरोग्य सभापतिपदासाठी सतीश कुलकर्णी, उपसभापतिपदाकरिता पल्लवी पाटील तर शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदासाठी पूनम सोनवणे आणि उपसभापतिपदाकरिता अंबादास पगारे यांचे अर्ज दाखल झाले. 

अर्ज दाखल करतेवेळी महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, गटनेते संभाजी मोरुस्कर, पंडित आवारे, प्रतिभा पवार, शीतल माळोदे, सुरेश खेताडे आदी उपस्थित होते. 

सतीश कुलकर्णींना संधी 

भाजपाचे ज्येष्ठ सदस्य सतीश कुलकर्णी यांना पक्षाने आरोग्य समिती सभापतिपदाची पुन्हा एक संधी दिली आहे. गेल्या वर्षभरातील कुलकर्णी यांची कामगिरी तसेच त्यांचा त्या विषयातील अभ्यास पाहता पक्षाने हा निर्णय घेतला असावा. तसेच त्यांनीदेखील पक्षाकडे ही समिती गेल्यावेळी मागून घेतली होती. तर दुसरीकडे ज्येष्ठ सदस्याला केवळ सभापतिपदाच्या गराड्यातच गुंतवून ठेवण्यात येत असल्याचीही चर्चा आहे.