Mon, Jul 22, 2019 00:38होमपेज › Nashik › नाशिक : करवाढीविरोधात दबावतंत्र

नाशिक : करवाढीविरोधात दबावतंत्र

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 25 2018 12:15AMनाशिक : प्रतिनिधी

करवाढीसंदर्भात झालेला ठराव सादर करण्यासाठी विचारणा करणार्‍या महापौरांना ठराव पाठवू नका, तुम्हीच अडचणीत याल, अशा प्रकारे सूचना करत जिल्हा प्रशासनाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा आहे. यामुळे प्रशासनातील अधिकारी एकमेकांना सांभाळून घेण्याचे काम करत आहेत की काय अशी शंका उपस्थित केली जात असून, जिल्हा प्रशासनही करवाढीमुळे  संतापलेल्या नागरिकांच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करयोग्य मूल्य निश्‍चित करून मोकळी मैदाने व शेतजमिनींवरही कर लादल्याने संपूर्ण नाशिककरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्याची चुणूक सोमवारी (दि.23) झालेल्या महासभेत आणि राजीव गांधी भवनबाहेर शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या धरणे आंदोलनाद्वारे आली. प्रभाग 13 च्या निवडणुकीच्या आचारसंहिता कालवधीतच मनपाने करवाढीचा अध्यादेश जाहीर केल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार महासभा निवडणूक आयोगाकडे करणार आहे. तसेच महासभेने करवाढीच्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे. यामुळे पुरते हादरून गेेलेल्या प्रशासनाकडून आता महासभेचा ठराव बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे आयुक्तांविरोधातील ठराव जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी पदाधिकार्‍यांकडून तयारी सुरू आहे.

यासंदर्भात महापौर रंजना भानसी यांनी जिल्हा प्रशासनाला दूरध्वनी करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तुम्ही ठराव पाठवूच नका अडचणीत याल असे बोलून संबंधितांनी एकप्रकारे महापौरांना कायद्याचा धाक दाखवत घाबरविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन कायद्याचे पालन करण्यासाठी आहे की दबाव टाकण्यासाठी आहे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

86 नगरसेवकांचा विरोध 

महासभेत एकूण 122 पैकी 86 नगरसेवकांनी करवाढ आणि करयोग्य मूल्यास विरोध करत संबंधित निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या विषयाला नगरसेवकांचा विरोध असणे ही बाब एक प्रकारे प्रशासनाविरोधात अविश्‍वास दर्शविण्यासारखीच असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याबरोबरच मनपा पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. 

आज गटनेत्यांची बैठक 

दरम्यान, ठराव व इतर बाबींविषयी तत्काळ निर्णय घेण्यासाठी महापौरांनी सर्वपक्षीय गटनेते तसेच पदाधिकार्‍यांची बैठक ‘रामायण’ येथे बोलविली आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून पुढील आंदोलन व कार्यवाहीची दिशा ठरविली जाणार आहे. 

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष 

महासभा आणि नागरिकांच्या आंदोलनानंतर आयुक्त काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागून आहे. कारण याआधी आयुक्तांनी ग्रीन झोनमधील शेतजमिनीवरील करयोग्य मूल्य हटवून मोकळी मैदाने व शेतजमिनींसाठी वीस पैसे प्रति चौ. फूट इतकी आकारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु, या करवाढीलाही नागरिकांचा विरोध आहे. यामुळे संतापलेले नागरिक व महासभेचा कल पाहता आयुक्त आणखी त्यांच्या निर्णयात काय बदल करतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags : nashik, tax increases, tukaram munde