Fri, Nov 16, 2018 04:27होमपेज › Nashik › ‘बॉश’ प्रकरणात पोलिसांनीही मारला हात?

‘बॉश’ प्रकरणात पोलिसांनीही मारला हात?

Published On: Jan 14 2018 2:16AM | Last Updated: Jan 14 2018 2:12AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

बॉश कंपनीतून स्क्रॅप स्पेअर पार्ट चोरी करून त्याचे बनावटीकरण करण्याचा पर्दाफाश अंबड पोलिसांनी केला. मात्र, याच पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी संशयितांकडून लाखो रुपये उकळल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या राजकारण्यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणात हात ओले करणार्‍या पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांचीही चौकशी केली जाणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

सिडकोतील पंडितनगर परिसरात तीन मजली इमारतीत छापा टाकून अंबड पोलिसांनी 23 टन चोरीचा आणि बनावटीकरण केलेला मुद्देमाल जप्‍त केला आहे. रहिवासी भागातील इमारतीत कंपनी सुरू करून संशयितांनी बक्कळ माया कमावल्याची चर्चा रंगली. त्यातच याची भणक लागताच पोलीस कर्मचार्‍यापासून वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत काहींनी संशयितांशी संपर्क साधून कंपनी उघडकीस न आणण्याच्या मोबदल्यात लाखो रुपये घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. सुरुवातीस अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यास या इमारतीत कंपनी सुरू असल्याचे समजताच त्याने पाहणीच्या नावाखाली संशयितांकडून पैसे उकळले.

त्यानंतर त्याच्यावरील अधिकार्‍यांनीही स्वतंत्र चौकशीच्या नावाखाली क्षमतेनुसार ‘आर्थिक’ फायदा करीत कंपनी सुरू ठेवण्यास अप्रत्यक्षरीत्या मंजुरीच दिल्याची चर्चा आहे. त्यात काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही खिसा गरम केल्याची चर्चा आहे. दरम्यान, संशयितांना मदत करण्याच्या मोबदल्यात आर्थिक व्यवहार करणार्‍या लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकार्‍यांची चौकशी पोलिसांनी केली. त्याचप्रमाणे पैसे घेणार्‍या पोलिसांचीही चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.