Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Nashik › नाशिकच्या सतरा क्रीडापटूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

नाशिकच्या सतरा क्रीडापटूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 11:47PMनाशिक : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रासाठी देण्यात येणार्‍या सर्वोच्च अशा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली असून, त्यात नाशिकच्या तब्बल सतरा क्रीडापटूंचा समावेश आहे. सोमवारी (दि.12) गेल्या तीन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यांत ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ, प्रशिक्षक विजेंद्र सिंग आदींचा समावेश आहे. 

प्रत्येकी एक लाख रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. सन 2014-15, 2015-16, 2016-17 या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले असून, त्यांत सन 2014-15 : राजू शिंदे (तलवारबाजी मार्गदर्शक), प्रज्ञा गद्रे (खेळाडू, बॅडमिंटन), अस्मिता दुधारे (खेळाडू, तलवारबाजी), श्रेया गावंडे (खेळाडू, नेमबाजी), विदित गुजराथी (खेळाडू, बुद्धिबळ), 2015-16 : अविनाश खैरनार (क्रीडा संघटक), श्रद्धा नालमवार (खेळाडू, नेमबाजी), अक्षय अष्टपुत्रे (खेळाडू, नेमबाजी), संतोष कडाळे (खेळाडू, रोइंग), 2016-17 : विजेंद्र सिंग (क्रीडा मार्गदर्शक, अ‍ॅथेलेटिक्स), शरयू पाटील (खेळाडू, तलवारबाजी),  दत्तू भोकनळ  (खेळाडू, रोइंग), संजीवनी जाधव (खेळाडू, अ‍ॅथेलेटिक्स), सचिन गलांडे (प्रशिक्षक, शरीरसौष्ठव), अंबादास तांबे (प्रशिक्षक, रोइंग), महेंद्र महाजन, हितेंद्र महाजन (सायकलपटू) यांचा समावेश आहे. 

दरम्यान, यापूर्वी सन 2009-2010, 2010-11, 2011-12 या तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रितरीत्या देण्यात आले होते. तेव्हा नाशिकच्या 7 क्रीडापटूंना हा सन्मान लाभला होता. मात्र, यंदा नाशिककर क्रीडापटूंना विक्रमी संख्येने पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांसाठी यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र मदतकक्ष सुरू केला होता.