होमपेज › Nashik › जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर छापेमारी 

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर छापेमारी 

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 06 2018 11:34PMनाशिक : प्रतिनिधी

अवैध धंदे बंद करण्यासाठी राज्यभरात पोलीस दलामार्फत क्रॅक डाउन 2018 ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनीदेखील या मोहिमेतंर्गत जिल्ह्यात 70 हून अधिक गुन्हे दाखल करून 47 संशयितांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असल्याचा दावा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस दलातील 40 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी अवैध धंदे चालवणार्‍यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार जिल्हाभरातील हॉटेल, ढाबे यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच, अवैध दारुविक्री, दारु वाहतूक आणि साठा करणार्‍या संशयितांची तपासणी केली जात आहे. जुगार अड्डे चालवणार्‍या आणि खेळणार्‍यांवरही पोलिसांतर्फे कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागासह, डोंगर, दर्‍या, नदीकिनारी सुरू असलेल्या गावठी दारु अड्ड्यांचीही तपासणी ग्रामीण पोलिसांतर्फे केली जात आहे. या कारवाईदरम्यान, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दारुबंदी कायद्यान्वये 57 गुन्हे दाखल करण्यात आले असून, तीन लाख 50 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा व हातभट्टीची दारु जप्‍त केली आहे.