Sun, May 26, 2019 13:15होमपेज › Nashik › घरबसल्या ऑनलाइन दाखले मिळणार

घरबसल्या ऑनलाइन दाखले मिळणार

Published On: Mar 06 2018 1:54AM | Last Updated: Mar 06 2018 1:53AMनाशिक : प्रतिनिधी

सेतू केंद्रांमध्ये दाखले काढताना नागरिकांची होणारी परवड येत्या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे. जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून (दि.5) शहरातील सेतू केंद्र बंद केले आहे. नागरिकांना घरबसल्या संपूर्णत: ऑनलाइन पद्धतीने दाखले मिळवता येणार आहे. तसेच, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील 31 प्रभागांमध्ये 83 आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली आहे.

एप्रिल ते जुलै या काळात सेतू केंद्रांवर जातीचे, उत्पन्नाचे, डोमेसाइल व राष्ट्रीय असे विविध दाखले काढण्यासाठी नेहमीच गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेत दलाल नागरिकांकडून दाखले काढून घेण्याच्या नावाखाली वारेमाप पैसे उकळतात. दुसरीकडे सेतू केंद्रातील कर्मचार्‍यांच्या उर्मटपणाचा अनुभव सर्वसामान्यांसाठी नवीन नाही. हीच पार्श्‍वभूमी लक्षात घेता प्रशासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून घरबसल्या 16 प्रकारचे ऑनलाइन दाखले देण्याची सुविधा कार्यान्वित केली आहे.

त्यामुळे दाखल्यांसाठी नागरिकांना आता शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाही. आपले सरकारच्या माध्यमातून डिजिटल स्वाक्षरीने नागरिकांना दाखले वितरित केले जाणार आहेत. नागरिकांनी घरबसल्या दाखल्यासाठीचा अर्ज भरून द्यावयाचा आहे. या अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे स्कॅनिंग करून देता येणार आहे. ज्यांच्या घरी या सुविधा उपलब्ध नसतील अशा नागरिकांसाठी शहरातील 31 प्रभागांमध्ये 83 आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

या केंद्रावर जाऊन देखील नागरिकांना अर्ज भरता येणार आहे.  प्रत्येक केंद्राच्या बाहेर दाखल्यासाठीची फी व तो दाखला किती दिवसात मिळेल याचा फलक लावण्याच्या सूचना संबंधित केंद्रचालकांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच, एखाद्या ठिकाणी केंद्रचालक जादा पैशांची मागणी करत असल्यास रितसर प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. दरम्यान, शहरातील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हाच प्रयोग तालुकास्तरावर राबविण्याची तयारी प्रशासनाने केली आहेे. 

शिक्षण विभागाला सूचना देणार

जिल्हा प्रशासनाकडून दिले जाणारे डिजिटल स्वाक्षरीचे दाखले अनेक शैक्षणिक संस्थांकडून नाकारले जातात. दाखल्यावर प्रशासनाचा शिक्का आणण्याचे फर्मान विद्यार्थ्यांना देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला असता डिजिटल दाखले आता दिले जात असल्याचे सांगण्यात येते. परिणामी विद्यार्थ्यांचे हाल होतात. विद्यार्थ्यांची ही ओढाताण लक्षात घेऊन शिक्षण विभागाला डिजिटल स्वाक्षरीचे दाखले स्वीकारण्याचे निर्देश देण्यात येतील, असे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.  त्यामूळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. तसेच आर्थिक भूर्दंडही सोसावा लागणार नाही, असा दिलासा सुविधेमूळे मिळणार आहे.