होमपेज › Nashik › शेतकर्‍यांना मोबदल्याऐवजी नोटिसा

शेतकर्‍यांना मोबदल्याऐवजी नोटिसा

Published On: Mar 06 2018 1:54AM | Last Updated: Mar 06 2018 1:44AMनाशिक : प्रतिनिधी

आरक्षित जमिनीच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता संबंधित जमिनीवर काहीही करायचे नाही, अशा प्रकारची उलटपक्षी नोटीस नाशिक मनपाने जमीनमालकांना काढली आहे. यामुळे मनपाच्या या भूमिकेवर ‘हसावे की रडावे’, अशी गत शेतकर्‍यांची झाली आहे. शेतकर्‍यांवर होणारे अन्याय थांबावे यासाठी शासनाकडून आदेशावर आदेश काढले जात असताना हे आदेश कागदावरच राहत असून, प्रशासनाकडूनही जुलूम केला जात आहे. 

पंचवटी विभागातील आडगाव आणि परिसरात असलेल्या शेकडो शेतकर्‍यांच्या जमिनी मनपा व शासनाने सिंहस्थासाठी आरक्षित केल्या आहेत. मात्र, यापैकी कुणाही शेतकर्‍यांना अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून अनेक शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी अनेक शेतकर्‍यांच्या जमिनींवर केवळ आरक्षण टाकलेले आहे. तर काही शेतकर्‍यांच्या जमिनींवर रस्ते तसेच इतरही बाबींसाठी त्याचा वापर केला आहे.

सिंहस्थामध्ये शेतकर्‍यांकडून प्रशासनाने गोडीगुलाबीने जमिनी ताब्यात घेऊन मोबदला देण्याचे आमिष दाखविले. परंतु, सिंहस्थ तोंडावर येताच वार्षिक दहा लाख रुपये एकराने भाडे अदा करून 350 एकर इतकी जमीन ताब्यात घेतली. या जागेवर प्रशासनाने रस्ते, पाणीपुरवठा वाहिनी, चर, गटार तसेच दगडाची कच व मुरूम टाकून जमिनी नापिकी करून टाकल्या. 

यामुळे जमिनी ताब्यात घेऊन मोबदला मिळत नाही तोपर्यंत मनपाने वार्षिक एकरी दहा लाख रुपये इतके भाडे द्यावे, आम्ही जागा खाली करून देण्यास तयार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात येत्या आठ दिवसांत संबंधित शेतकरी मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले आहे.