Sun, Mar 24, 2019 05:04होमपेज › Nashik › जिल्हा आरोग्याधिकार्‍यांच्या मेहेरबानीमुळे कारवाई रखडली

जिल्हा आरोग्याधिकार्‍यांच्या मेहेरबानीमुळे कारवाई रखडली

Published On: Mar 06 2018 1:54AM | Last Updated: Mar 06 2018 1:51AMनाशिक : प्रतिनिधी

निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण तसेच, विस्तार अधिकारी (आयुष) जगन्नाथ वाडीकर यांच्याविरोधात तक्रारींचा पाऊस पडला असला तरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाक्चौरे यांच्या मेहेरबानीने मात्र कारवाई लटकली आहे. विशेष म्हणजे, वाडीकर यांचा सादर केलेला प्रस्ताव फाडण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

चव्हाण यांच्याबरोबरच एका आरोग्यसेविकेच्या कामकाजाविरोधात दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, यतीन कदम यांनी आवाज उठविला होता. चव्हाण यांचा पद्भार काढून घ्यावा तर आरोग्यसेविकेला निलंबित करावे, असे ठराव यावेळी करण्यात आला. ठरावाची अंमलबजावणी करताना आरोग्यसेविकेला निलंबित करण्याची तत्परता दाखविण्यात आली. दुसरीकडे चव्हाण यांचा पदभार काढून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारला पाठवायचा असला तरी दोन महिन्याच्या काळात मात्र त्यावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची स्वाक्षरीच होऊ शकलेली नाही. 

त्यामुळे चव्हाण यांना वाक्चौरे यांचे अभय असल्याच्या आरोपाला बळकटी मिळत आहे. चव्हाण मॅटमध्ये गेल्यास त्यावर तत्काळ स्थगिती मिळू शकते, अशी भीतीच सदस्यांना दाखविली जात आहे. वाडीकर यांच्याहीबाबतीत वाक्चौरे यांच्याकडून कमालीची मेहेरबानी दाखविली जात असल्याने संशयाचे धुके दाटले आहे. वैद्यकीय देयकावरून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, शिक्षण सभापती यतींद्र पगार यांनी आरोग्य विभागाला भेट देत जाब विचारला होता.

वाडीकर यांच्याविरोधात तक्रारी असल्याने त्यांच्याकडून तत्काळ पद्भार काढून घ्यावा, असे आदेश वाक्चौरे यांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र चव्हाण यांच्याप्रमाणेच वाडीकर यांचाही प्रस्ताव भिजत ठेवण्यात धन्यता मानण्यात आली आहे. सांगळे यांच्या आदेशानंतर संबंधित लिपिकाने वाडीकर यांचा पद्भार काढून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव टेबलावर ठेवला तेव्हा वाक्चौरे यांनी चक्क प्रस्तावच फाडून टाकला. प्रस्ताव ठेवणार्‍या लिपिकालाच खडेबोल सुनावण्यात आले. वादग्रस्त अधिकारी कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची वाक्चौरे यांची भूमिकाच संशयास्पद ठरली आहे.