Tue, Jul 23, 2019 10:45होमपेज › Nashik › मनपाच्या अंदाजपत्रकामध्ये 50 कोटी महसुलाची वाढ

मनपाच्या अंदाजपत्रकामध्ये 50 कोटी महसुलाची वाढ

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 12:45AMनाशिक : प्रतिनिधी

मनपाचे चालू आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात 50 कोटींची वाढ होणार आहे. यामुळे महापालिकेच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. मालमत्ता करासह पाणीपट्टीत यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने अंदाजपत्रकात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. यामुळे 2018-19 या नवीन आर्थिक वर्षाचे नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचे काम लेखा व वित्त कार्यालयाकडून सुरू असून, चालू वर्षाचे सुधारित अंदाजपत्रकाचेहीं काम मनपाने हाती घेतले आहे.

आयुक्‍तांनी 1410 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात 380 कोटींची वाढ स्थायी समितीने केली होती. यामुळे हेच अंदाजपत्रक 1790 कोटींपर्यंत गेले आणि महासभेने त्यात आणखी सुमारे 300 कोटींची वाढ केल्याने अंदाजपत्रक 2100 कोटींपर्यंत गेले. परंतु, हे फुगलेले अंदाजपत्रक 1500 कोटींचाही टप्पा पार करू शकलेले नाही. याउलट आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी सादर केलेले 1410 कोटींच्या

अंदाजपत्रकात मात्र 50 कोटींची भर पडली आहे तर दुसरीकडे स्थायी समिती आणि महासभेने विविध उपाययोजना आणि महसूलात वाढ होण्याचे अनेक मार्ग सांगूनही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही की स्थायी आणि महासभेने त्याबाबत कधी विचारणाही केली नाही. 
मालमत्ता कर आणि पाणीपट्टीमध्ये यावेळी विविध कर विभागाकडून चांगली वसुली झाली आहे. या वसुलीच्या जोरावरच मनपाच्या उत्पन्नात वाढ झाल्याने मनपा आयुक्‍तांचे अंदाजपत्रकातही भर पडली आहे.

नवीन अंदाजपत्रकही जवळपास 1600 कोटींच्या पुढेच टप्पा गाठण्याची शक्यता आहे. विकास शुल्क, अनियमित बांधकामे नियमित करणे यासह मालमत्ता सर्वेक्षणातील 67 हजार नवीन मिळकती आणि 35 कोटींची पाणीपट्टीतील थकबाकी यामुळे मनपाचा महसूल जवळपास 200 कोटीहून अधिक वाढणार आहे.