Tue, Jul 16, 2019 10:23होमपेज › Nashik › दोनऐवजी आता 20 हजारांची घरपट्टी

दोनऐवजी आता 20 हजारांची घरपट्टी

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 28 2018 10:48PMनाशिक : प्रतिनिधी

महासभेने केलेल्या करवाढीव्यतिरिक्‍त आयुक्‍तांनी निश्‍चित केलेल्या करयोग्य मूल्य दरवाढीच्या विशेष नोटिसांनी नाशिककरांची झोप उडाली आहे. दोन हजार रुपयांपर्यंत भरण्यात येत असलेल्या कराच्या जागी आता नाशिककरांना वार्षिक 20 हजार इतका भर भरावा लागणार आहे. मनपा प्रशासनाने बजावलेल्या अनेक मिळकतधारकांनी महापौरांसह पदाधिकार्‍यांची भेट घेऊन आपली कैफीयत मांडली. निवासी, व्यावसायिक आणि मोकळ्या भूखंडांवरील ही करवाढ नाशिककरांना जीवघेणी ठरणार आहे. 

आयुक्‍तांनी मोकळ्या भूखंडांसह नवीन मिळकतींवर करयोग्य मूल्य दर निश्‍चित केला आहे. पूर्वी हा दर मोकळ्या भूखंडांसाठी 3 पैसे प्रती चौ. मी. इतका होता. आता हाच कर 40 टक्क्याने वाढविला आहे. त्याचबरोबर निवासीसाठी पूर्वीचा दर 5.50 रुपये चौ. मी. होता. आता हाच दर 22 रुपये करण्यात आला असून, या 22 रुपयांवर 20 टक्के अतिरिक्‍त बिल्टअप एरिया मिळून करवाढ लादली आहे.

यामुळे ही करवाढ म्हणजे नाशिककरांची आयुष्यभर डोकेदुखीच ठरणार आहे. महासभेने आयुक्‍तांचा करयोग्य मूल्य दरवाढीचा आदेश महासभेत रद्द करण्याचा निर्णय 19 जुलै रोजी घेतला होता. असे असताना आयुक्‍तांनी मात्र या ठरावाला केराची टोपली दाखवत आपल्याच आदेशाची अंमलबजावणी करत त्यानुसार विशेष नोटिसा पाठविल्या आहेत. महासभेच्या अधिकारालाही आयुक्‍तांनी जुमानले नाही की लोकशाही पद्धतीने महासभेचा ठराव विखंडनासाठी देखील सादर केला नाही. याच कारणामुळे महासभेने आयुक्‍तांवर अविश्‍वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला.