Wed, May 22, 2019 15:23होमपेज › Nashik › मनपाच्या ११ कर्मचार्‍यांना बडतर्फीची नोटीस

मनपाच्या ११ कर्मचार्‍यांना बडतर्फीची नोटीस

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:45AMनाशिक : प्रतिनिधी

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने 11 कर्मचार्‍यांना बडतर्फीची कारवाई करण्याबाबतची नोटीस बजावली आहे. यामुळे कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले असून, या कारवाईनंतर मनपातील इतरही कर्मचार्‍यांच्या प्रमाणपत्राविषयी खात्री करून अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्‍तांनी सर्वच खातेप्रमुखांना दिले आहेत. 

आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कामचुकारपणा व अनियमितता करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे अनेक कर्मचार्‍यांना पळतीभुई थोडी झाली आहे. आजवर निलंबनाच्या कारवाईपर्यंत सीमित असलेल्या प्रशासनाने थेट बडतर्फीचे पाऊल उचलल्याने अनेक कर्मचार्‍यांनी या कारवाईचा धसका घेतला आहे.

नोकरीवर रुजू होताना जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. अथवा शासन निर्णयाप्रमाणे दिलेल्या कालावधीत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. असे असताना मनपाच्या संबंधित 11 कर्मचार्‍यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही की, संबंधित जातपडताळणी समितीकडेही तसा अर्ज केला नाही. एकूणच यासंदर्भात नगरविकास खात्याने माहिती मागविली होती. नाशिक मनपाकडेही माहिती मागविली असता त्यात 11 कर्मचारी आढळले 

दुर्गा वामन नेरे (शिपाई), सुमेश बिरदास दिवे (बिगारी), प्रवीण जगन्नाथ गांगुर्डे (बिगारी), अनिल कृष्णा पवार (बिगारी), मनोहर मोहन ढालवाले (बिगारी), राजू गंगाधर लोंढे (वॉर्डबॉय), देवजी धनाजी रेवर (स्वच्छता मुकादम), राजू नानासाहेब पगारे (वॉर्डबॉय) यांनी अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्याचबरोबर अनिल रामचंद्र सौदे (मशीन फिटर वर्कर) यांनी विमुक्‍त जाती अ, पारूबाई अरुण धुमाळ (आया) भटक्या जमाती, तर रमेश प्रभाकर नागपुरे (स्वच्छता मुकादम) यांनी विशेष मागास प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यातील पाच कर्मचारी हे 2003 मध्ये तसेच काही कर्मचारी 1981 काही कर्मचारी हे 1992 ते 1995 या कालावधीत महापालिकेत नोकरीवर रुजू झालेले आहेत. या प्रकरणातील कर्मचार्‍यांनी अनेक वर्षांपासून प्रमाणपत्र दिलेले नसल्याची बाब प्रशासनातील अधिकार्‍यांनी आजवर नजरेआड करण्याचे कारण काय? यामुळे अशा अधिकार्‍यांवर आयुक्‍त काय कारवाई करणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

नाशिकरोड विभागीय कार्यालयातील विविध कर विभागाचे सहायक अधीक्षक बाळू रामभाऊ काळे यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणे या आरोपाखाली कर्तव्यात कसूर केल्याबद्दल नोटीस देण्यात आली आहे.

 

Tags : nashik, nashik news, Nashik Municipal Corporation,employees, rusticated