Fri, Jul 19, 2019 20:14होमपेज › Nashik › घरपट्टी वसुलीसाठी मनपा करणार मालमत्तांचा लिलाव

घरपट्टी वसुलीसाठी मनपा करणार मालमत्तांचा लिलाव

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 31 2018 12:02AMनाशिक : ज्ञानेश्‍वर वाघ

मालमत्ताकराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपाच्या मूल्य निर्धारण व विविध कर व मूल्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 35 कोटींची घरपट्टी थकबाकी वसूल करण्यासाठी 94 हजार 77 थकबाकीदारांना अंतिम सूचना पत्र बजावले असून, या नोटिसानंतर जप्‍ती वॉरंट काढूनही थकबाकी न भरणार्‍यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील 10 लाखांहून अधिक रकमेची थकबाकी असणार्‍या सुमारे 50 बड्या मालमत्ताधारकांची यादी तयार करण्यात आली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील काही बड्या आसामींकडून मालमत्ताकराची थकबाकीच भरली जात नाही. याबाबत मनपाकडून संबंधितांना वारंवार नोटिसा बजावण्यात  आल्या आहेत. मात्र, राजकीय दबाव आणि मनपातीलच काही हितसंंबंध असलेल्या कर्मचारी व अधिकार्‍यांना हाताशी धरून आजवर  चालढकल केलेली आहे. परंतु, यावेळी मात्र थकबाकी असलेला सुमारे 35 कोटींचा कर वसूल करण्यासाठी मनपाने कंबर कसली आहे. त्यासाठी सुरुवातीला पाच हजार, 10 हजार, 25 हजार व 50 हजारांपुढील थकबाकी असलेल्या तसेच 10 लाखांपर्यंत कर थकबाकी असलेल्या 94 हजार 77 मालमत्ताधारकांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मार्चअखेरपर्यंत 35 कोटींची वसुली करायची असल्याने नोटीस बजावल्यापासून संबंधितांना 15 दिवसांची मुदत थकबाकी भरण्यासाठी देण्यात आली आहे.