Mon, Apr 22, 2019 15:58होमपेज › Nashik › मनपा आयुक्‍त मुंढे यांचा परदेश दौरा रद्द

मनपा आयुक्‍त मुंढे यांचा परदेश दौरा रद्द

Published On: Apr 27 2018 11:21PM | Last Updated: Apr 27 2018 11:03PMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांचा परदेश दौरा रद्द झाला आहे. यामुळे आज (दि.28) होणारा ‘वॉक विथ कमिशनर’ हा कार्यक्रम होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रजेची चर्चा रंगली होती. गेल्या महिन्यातदेखील 24 तारखेपासून आयुक्‍त रजेवर जाणार आणि त्यांचा कार्यभार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता 28 एप्रिलपासून 13 मेपर्यंत ते त्यांच्या युरोप येथील खासगी दौर्‍यासाठी जाणार असल्याची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू होती. 

महापालिकेत कार्यभार घेतल्यापासून आयुक्‍त कर्मचारी आणि अधिकार्‍यांना एक एक झटका देत असल्याने बहुतांश सर्वच कर्मचार्‍यांची भीतीने गाळण उडालेली आहे. यामुळे पंधरा दिवस आयुक्‍त सुट्टीवर जाणार असल्याने अनेकजण खूश दिसून येत होते. याच आनंदाच्या भरात प्रत्येकजण त्यांच्या सुट्टीचा कानोसा घेताना दिसून आला. परंतु, त्यांचा परदेश दौरा रद्द झाल्याने आनंदोत्सव साजरा करणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांची निराशा झाली आहे. अर्थात, ही बाब कुणी उघड उघड बोलत नसले तरी अशी कुजबूज मात्र महापालिकेत सुरू आहे. आयुक्‍त दौर्‍यावर जाणार असल्याने शनिवारच्या (दि.28) त्यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या कार्यक्रमाचे काय होणार अशी चर्चा होती. परंतु, महापालिकेने शहरभर लावलेल्या होर्डिंगवरही प्रशासनाने 28 एप्रिल अशी तारीख टाकून कार्यक्रम होणार असल्यावर शिक्‍कामोर्तब केले. तर दुसरीकडे मनपातीलच काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी आयुक्‍तांचा दौरा रद्द झाल्याचे सांगितले.
 

Tags : Municipal Commissioner,  Tukaram Mundhe, foreign trips,