होमपेज › Nashik › शहर स्वच्छतेसाठी महापौरांचा ‘मॉर्निंग वॉक’

शहर स्वच्छतेसाठी महापौरांचा ‘मॉर्निंग वॉक’

Published On: Jan 02 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 12:02AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने कंबर कसली असून, महापौर रंजना भानसी सकाळी 7 ते 9 या वेळेत शहरातील विविध ठिकाणी भेट देवून स्वच्छतेची पाहणी करणार आहेत. मंगळवारी (दि.2) सकाळी महापालिकेची मुख्य इमारत असलेल्या राजीव गांधी भवनपासून या स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहेत.

स्वच्छता मोहिमेच्या कितीही गमजा मारल्या तरी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पहायला मिळते. ज्या ठिकाणी महापालिकेने ब्लॅक स्पॉट निश्‍चित केले होते त्या ठिकाणी उघड्यावरच कचर्‍याचे ढीग पडल्याचे दिसून येते. त्यामुळे गतवर्षी देशभरातील स्वच्छ शहराच्या यादीत नाशिक 153 व्या स्थानावर होते. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचे वाभाडे निघाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर नववर्षापासून सत्ताधारी भाजपा स्वच्छता मोहिमेला प्राधान्य देणार आहे.

त्यासाठी महापौर रंजना भानसी स्वत: सकाळच्या वेळी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेणार आहेत. त्यामध्ये लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला गोदाघाट, रामकुंड, पंचवटी, धार्मिक स्थळ परिसर, रविवार कारंजा, मेनरोड आदींसह ब्लॅक स्पॉट या ठिकाणी भेट देऊन तेथील स्वच्छता मोहिमेचा आढावा घेणार आहेत. महापालिकेची मुख्य इमारत व विभागीय कार्यालयातील स्वच्छता गृहे यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

त्यामुळे महापालिकेपासून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला जाणार आहे. त्यात स्वच्छता गृहातील तुटलेली भांडे, खिडक्या, दरवाजे यांची डागडुजी केली जाणार असून, या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. दरम्यान, रस्त्यांतील दुभाजके आणि रस्त्यालगतचा दोन्ही बाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवण्याबाबतही महापौरांकडून सूचना देण्यात येणार आहे.